Dehu political News : पॉलिटिक्स विथ रिस्पेक्ट! पराभूत उमेदवार प्रा. विकास कंद यांनी विजयी उमेदवारांच्या घरी जावून केले अभिनंदन
प्रा. कंद यांच्या उपक्रमाचे देहू परिसरात कौतुक
Pckhabar- निवडणूकीत पराभव झाला म्हटले की अनेक राजकीय नेतेमंडळी विजनवासात जातात…पाच वर्षे सामाजिक कार्यापासून, जनतेपासून अलिप्त होतात… आपल्याला ज्या उमेदवाराने पराभूत केले त्याचे तोंड देखील पाहत नाहीत… मात्र, याला अपवाद ठरणारे उदाहरण देहू येथे घडले आहे. नुकत्याच पार पडलेल्या देहू नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पराभूत उमेदवार प्रा. विकास कंद यांनी ‘पॉलिटिक्स विथ रिस्पेक्ट’ या ऊक्तीप्रमाणे सर्व विजयी उमेदवारांच्या घरी जावून फेटा बांधून व श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेट देऊन सन्मान केला.
प्रा. कंद यांच्या या उपक्रमाचे देहू परिसरात मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
नव्याने निर्माण झालेल्या देहू नगरपंचायत निवडणूकीचा 19 जानेवारी रोजी निकाल लागला. पहिल्याच नगरपंचायत निवडणूकीत आमदार सुनिल शेळके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती सत्ता काबीज केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे 14, दोन अपक्ष तर भारतीय जनता पक्षाचा एक उमेदवार विजयी झाला. या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 7 चे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रा. विकास कंद यांचा अवघ्या 71 मतांनी अपक्ष उमेदवार योगेश काळोखे यांनी पराभव केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या व कंद यांच्या कार्यकर्त्यांना त्यांचा पराभव जिव्हारी लागला. ‘गड आला पण सिंह गेला’, अशा भावना त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या. तसेच सामाजिक क्षेत्रात सतत कार्यरत असलेल्या एका चांगल्या कार्यकर्त्याला निवडणुकीत पराभवास सामोरे जावे लागल्याने प्रभागातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.
अभंग प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासत प्रा. विकास कंद हे गेल्या अनेक वर्षांपासून देहू परिसरात समाज उपयुक्त कार्य सातत्याने करत आहेत. त्यामुळे निवडणुकीत झालेल्या पराभवाने खचून न जाता प्रा. कंद यांनी दुसऱ्या दिवसापासून आपल्या सामाजिक कार्यास सुरूवात केली आहे. आपल्या सहकाऱ्यांसह प्रा. कंद यांनी आपल्याला पराभूत केलेल्या विजयी उमेदवारासह राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या विजयी उमेदवारांच्या घरी जावून फेटा बांधून व श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेट देऊन सन्मान करत अभिनंदन केले. तसेच भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याबाबत प्रा. विकास कंद म्हणाले
”या जीवनात मन जिंकण्यासाठी आलो आहे! फक्त मत मिळविण्यासाठी नाही!!”
निवडणूक होईपर्यंत राजकारण करून त्यानंतर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एक विचाराने एकत्र येणे महत्त्वाचे असते. आपसातील वैयक्तिक मतभेद व विरोध गावाच्या सर्वांगीण विकासापुढे निश्चितपणे अतिशय लहान गोष्ट असते. या निवडणुकीत विजयी झालेले सर्व उमेदवार पुढील पाच वर्षात गावाच्या विकास प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. या सर्वांना साथ देऊन… सदिच्छा देण्यासाठी या सर्व विजयी लोकप्रतिनिधींचा फेटा बांधून व श्री विठ्ठल रुक्मिणी ची मूर्ती भेट देऊन सन्मान करण्यात आला. तसेच भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ”











Leave a Reply