Pimpri Crime News : मध्य प्रदेशातून पिस्तुलाची तस्करी करणारी टोळी जेरबंद

Pimpri Crime News : मध्य प्रदेशातून पिस्तुलाची तस्करी करणारी टोळी जेरबंद

१४ पिस्तूल, ८ काडतुसांसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

Pckhabar- मध्य प्रदेशमधून पिंपरी-चिंचवड शहरात पिस्तुले विक्रीसाठी आणणाऱ्या टोळीचा पिंपरी चिंचवड पोलिसांनी पर्दाफाश केला. चारजणांच्या टोळीकडून १४ पिस्तुले आणि आठ जिवंत काडतुसे असा ४ लाख ९० हजारांचा मुद्देमाल गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने जप्त केला. या कारवाईत चारजणांना अटक करण्यात आली. या टोळीतील आरोपीकडून यापूर्वीदेखील २४ पिस्तूल आणि १६ जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली होती.

आकाश अनिल मिसाळ (वय २१, रा. इंद्रायणीनगर, भोसरी), रूपेश सुरेश पाटील (वय ३०, रा. वडगाव बुद्रुक, ता. चोपडा, जि. जळगाव), ऋतिक दिलीप तापकीर (वय २६, रा. सुतारवाडी, पाषाण), अजित उर्फ विकी रामलाल गुप्ता (वय २८, रा. भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत.

वडमुखवाडी येथे काहीजण संशयितरीत्या फिरत असल्याची माहिती मिळाल्यावरून दरोडा विरोधी पथकाने ३ जानेवारी रोजी रात्री तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दुचाकी, दोन पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, तीन मोबाईल, मिरची पूड, नायलॉन दोरी असा ऐवज पोलिसांनी जप्त केला. आरोपी एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे पोलीस तपासात समोर आले.

या गुन्ह्यात आरोपींना १४ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. पोलीस कोठडीत असताना पोलिसांनी आरोपींच्या घराची झडती घेतली. त्यावेळी रूपेश आणि ऋतिक यांच्या फ्लॅटमधून सहा गावठी कट्टे आणि जिवंत काडतूस मिळाले तर आकाश मिसाळ याच्या घरातून चार गावठी कट्टे आणि जिवंत काडतूस मिळाले. पोलिसांनी हा शस्त्रसाठा जप्त केला. रूपेश याने भोसरी येथील अजित गुप्ता याला पिस्तूल विकले असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी गुप्ता यालाही अटक केली. त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.

या कारवाईत पोलिसांनी १४ पिस्तूल आणि आठ जिवंत काडतुसे असा ४ लाख ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आरोपी रूपेश आणि आकाश हे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. रूपेश पाटील आणि त्याच्या साथीदारांवर यापूर्वीदेखील पोलिसांनी कारवाई केली आहे. पूर्वीच्या कारवाईमध्ये रूपेश आणि टोळीकडून २४ पिस्तूल आणि १६ जिवंत काडतुसे जप्त केली होती. त्यानंतरदेखील तो सुधारला नाही. त्याने पुन्हा मध्य प्रदेशातून पिस्तूल आणून शहरात विक्री सुरू केली. रूपेश भोसरी आणि भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील दोन गुन्ह्यांत पसार होता. त्याच्यावर चिंचवड, देहूरोड आणि भोसरी पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहेत. आरोपी आकाश मिसाळ याच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात यापूर्वी एक गुन्हा दाखल आहे. ही कारवाई दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, फौजदार मंगेश भांगे यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *