Pimpri News: कृतज्ञता ही सर्वात सुंदर भावना : राजन लाखे

Pimpri News: कृतज्ञता ही सर्वात सुंदर भावना : राजन लाखे

Pckhabar- “कृतज्ञता ही मानवी जीवनातील सर्वात सुंदर भावना असून ‘मास्तरचं पोर’ या आत्मकथनामध्ये त्याचे प्रतिबिंब उमटले आहे. सत्य, शिव अन् सौंदर्य यांचा मिलाफ या लेखनात आढळतो!” असे विचार प्रसिद्ध कवी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद (पिंपरी-चिंचवड) शाखाध्यक्ष राजन लाखे यांनी व्यक्त केले.

पैस रंगमंच, प्रीमिअर प्लाझा इमारत, येथे शालेय स्पर्धा परीक्षा समुपदेशक शिरीष पडवळ लिखित ‘मास्तरचं पोर’ या आत्मकथनपर पुस्तकाचे प्रकाशन करताना राजन लाखे बोलत होते. ह.भ.प. किसनमहाराज चौधरी अध्यक्षस्थानी होते; तसेच ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले, प्रकाशिका रूपाली अवचरे आणि निखिल लंभाते यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

“वेगवेगळ्या स्तरांतील व्यक्तींच्या अभिव्यक्तीतून साहित्य हे खऱ्या अर्थाने समृद्ध होत असते!” असे मत श्रीकांत चौगुले यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. लेखक शिरीष पडवळ यांनी जीवनाच्या विविध टप्प्यांवर घडविणाऱ्या शिक्षकांविषयी कृतज्ञता आपल्या मनोगतातून नमूद केली. मातृहृदयी शिक्षक, साहित्यिक आणि थोर विचारवंत सानेगुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. रूपाली अवचरे यांनी प्रास्ताविक केले. ह.भ.प. किसनमहाराज चौधरी यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, “आयुष्याच्या पुस्तकात जन्म अन् मृत्यू या पहिल्या आणि शेवटच्या पानांवर माणूस काहीही लिहू शकत नाही; परंतु मधल्या पानावर आपण सुंदर रंग भरू शकतो!” असे विचार मांडले.

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर सुरक्षा नियमांचे पालन करून मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. अमोल नवलपुरे यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *