Dehugaon News : देहूतील श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे काम पूर्ण
जन्मदिनी मूर्ती प्रतिष्ठापणा व सुवर्ण कलशारोहण समारंभ
Pckhabar- तीर्थक्षेत्र देहूगाव येथील संत तुकाराम महाराज देऊळवाड्यातील श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे काम पूर्ण झाले आहे. या शिळा मंदिरात जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची मूर्ती प्रतिष्ठापणा आणि सुवर्ण कलशारोहण समारंभ संत तुकाराम महाराजांच्या जन्मदिनी करण्यात येणार आहे.
संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त भानुदास महाराज मोरे, माणिक महाराज मोरे यांनी याबाबतची माहिती दिली. देऊळवाड्यात संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने सुमारे एक कोटी १७ लाख रुपये खर्च करून संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचे संपूर्ण दगडामध्ये काम करण्यात आले आहे. या मंदिरातील आतील बाजूस चांदीच्या महिरप आणि मखरचे काम सुरू आहे.
विश्वस्त भानुदास महाराज मोरे यांनी सांगितले की, सध्या शिळा मंदिराचे काम पूर्ण झाले आहे. आतील बाजूस ७० किलो चांदी वापरून, मखरीचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच, साधारणपणे अर्धा किलो सोने वापरून दोन कलश बनविण्यात येणार आहेत. पुणे येथील रांका ज्वेलर्सकडे सध्या कलशाचे काम सुरू आहे.
अकलूज येथील विजयश्री पाटील, सुशांत आणि निशांत पाटील यांच्या वतीने कलश देण्यात येणार आहे. तसेच, चांदीच्या मखरीसाठी चिखलीतील ज्ञानेश्वर म्हेत्रे यांनी पाच किलो चांदी दिली आहे. उर्वरित कामासाठी भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन संस्थानकडून करण्यात आले आहे. पुढच्या महिन्यात वसंत पंचमीला म्हणजे ५ फेब्रुवारीला संत तुकाराम महाराज यांचा जन्मदिवस आहे. यादिवशी मूर्ती प्रतिष्ठापणा आणि कलशारोहण करण्यात येणार आहे.










Leave a Reply