Talegaon Dabhade News : नगराध्यक्षांसह आठ नगरसेवकांना राज्य सरकारचा दणका; ‘त्या’ प्रकरणी कारणे दाखवा नोटीस
Pckhabar-तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांसह आठ नगरसेवकांना कार्यकाल संपण्याच्या शेवटच्या दिवशी राज्य सरकारने मोठा दणका दिला आहे. स्टेशन विभागातील तळ्यामधील गाळ, माती, मुरुम लोक सहभागातून काढण्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर खर्च झाल्याच्या तक्रारीत अनियमितता झाल्याचे सकृतदर्शनी दिसून येत आहे. नगराध्यक्षांवर वित्तीय अधिकाराचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत त्यांना पुढील 6 वर्षासाठी नगरसेवक होण्यास अपात्र का ठरविण्यात येऊ नये अशी कारणे दाखवा नोटीस बजाविली.
तसेच स्थायी समितीचे सदस्य 7 नगरसेवकांनाही पुढील 5 वर्षासाठी नगरसेवक होण्यास अपात्र का ठरवू नये, अशी नोटीस दिली आहे. त्याबाबतचा लेखी खुलासा 15 दिवसाच्या आत मागितला असून मुदतीत खुलासा न केल्यास काहीही म्हणावयाचे नसल्याचे गृहित धरुन पुढील कार्यवाही करण्याचा इशारा दिला आहे.
नगरविकास खात्याचे कक्ष अधिकारी महेश हंशेट्टी यांनी या कारणे दाखवा नोटीसा (गुरुवारी) दिल्या आहेत.
तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या स्टेशन विभागातील तळ्यामधील गाळ, माती, मुरुम लोक सहभागातून काढण्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर झालेल्या खर्चात अनियमितता झाल्याचे सकृतदर्शनी दिसून येत आहे.
नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, भाजपचे नगरसेवक अरुण भेगडे, अमोल शेटे, नगरसेविका विभावरी दाभाडे, संध्या भेगडे, शोभा भेगडे, जनसेवा विकास समितीचे नगरसेवक संग्राम काकडे, तत्कालीन भाजपचे नगरसेवक संदीप शेळके यांना कारणे दाखवा नोटिसा दिल्या आहेत. तसेच, नगरसेवक अरुण भेगडे, अमोल शेटे, विभावरी दाभाडे, संध्या भेगडे, शोभा भेगडे यांना स्थायी समिती सदस्य म्हणून कामाचा सविस्तर आढावा न घेतल्याने नोटीस दिली आहे. दरम्यान संग्राम काकडे आणि तत्कालीन नगरसेवक संदीप शेळके यांच्यावर निविदाप्रक्रियेच्या कार्य पद्धतीबाबत खात्री न करताच निविदेस मंजुरी देण्याबाबतचा सूचक व अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केल्याचा ठपका ठेवला आहे.










Leave a Reply