माई ..!

माई ..!
डॉ.अंजली मुळके

Pckhabar- माई, तू गेलीस..
तुझ्या आजारपणाची साधी दखल घ्यायलाही बिकाऊ मीडियाला वेळ नव्हता..
तुझ्या जाण्याने तुझं नाव आकाशात किंकाळ्या आणि आक्रोशा सोबत दुमदुमलं..!
तू म्हणाली होतीस, खरंच, “या महाराष्ट्रात मोठं होण्यासाठी मरावं लागतं रे बाबा..!!”
तू गेल्यानंतर दुःखाचा आवेग दाखवणारी मीडिया आणि सरकार, प्रशासन यांची कीव वाटली..!!

तुझा जीवनपट डोळ्याखालून गेला..!

इतका त्याग, इतकं समर्पण आणि इतकी दुःखं झेलुनसुद्धा परक्या लेकरांना , निराश्रितांना आपलं करून त्यांना दोन घास खाऊ घालत जगवण्याची जिद्द आणि कष्टाची पराकाष्ठा पहिली नाही..!!

माँजिजाऊ, सावित्रीमाईंच्या रांगेला जाऊन बसण्याचा मान माईंनी मिळवला इतके क्षणा क्षणाचं समर्पण आणि कष्ट त्यांनी केलेत..!

महाराष्ट्राच्या मातीत अशा जिजाऊंच्या, सावित्रीच्या लेकी जन्मल्या, ते आपलं भाग्य म्हणावं की दुर्दैव..!!??

होय, दुर्दैवं यासाठी, की वयाच्या सत्तरीपार सुद्धा एका स्त्री ला शेकडो च्या आसपास सन्मान, पुरस्कार मिळूनही, आपल्या अनाथ लेकरांना खाऊ घालण्यासाठी “भाषण नहीं तो राशन नहीं” म्हणत कष्ट करूनच खाऊ घालावं लागलं..
“पुरस्काराने पोट भरत नाही” ही विवंचना आपलं कोणतंही सरकार, प्रशासन समजू शकलं नाही..
त्यांना शेवटपर्यंत जगण्याचा आणि जगवण्याचा लढा द्यावा लागला, हे दुर्दैवं नाही तर काय म्हणावं..!!??

आज शासकीय इतमामात तुझे अंत्यसंस्कार झाले माई..

पण ती माय उर फोडून त्या मातीतूनही हेच टाहो फोडत सांगत असणार, की , “माझ्या लेकरांना खाऊ घाला रे बाबांनो.. त्यांना भाकरी कमावता येईल इतका तरी आधार द्या..!!”
शासनाकडे कोट्यवधींचे बजेट आहे, पण अनाथाश्रम आणि तत्सम आश्रमांना द्यायला पैसा नाही ही केवळ दुर्दैवाचीच नव्हे, तर लाजिरवाणी गोष्ट आहे..!

आपण लग्ना कार्यात, लहान मोठ्या समारंभात कितीतरी अमाप पैसा पाण्यासारखा ओतत असतो.. केवळ प्रतिष्ठेखातर..
अशा कार्यक्रमांत कित्येक टन अन्न वाया जातं..
पण आपण यातला 10-20% देखील अनाथ आश्रमांना देऊ करत नाही..! शरमेची बाब आहे..!
आपण प्रतिष्ठेच्या नावाखाली मानवता, नीतिमूल्ये यांना जरादेखील महत्व देत नाहीत, हे दुर्दैवं..

आज माईंनी केलेल्या कष्टाला मोल नाही..!

निदान यापुढेतरी, होईल तितकं, अनाथ आणि निराश्रितांना मानवी मूल्याच्या चष्म्यातून बघण्याची दृष्टी देव आपल्याला देवो..!!!

माई…!!
तुझं मोठेपण तू जाण्याआधी पण होतं.. आणि मानवता जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत राहील..!

सलाम…!

-डॉ. अंजली मुळके

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *