Pimpri RTO News : चारचाकी वाहनांसाठी लवकरच नवीन मालिका
आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करण्याचे पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतूल आदे यांचे आवाहन
Pckhabar- चारचाकी वाहनांसाठी सुरु होणाऱ्या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक विहित शुल्क भरुन राखून ठेवण्याकरिता आगाऊ अर्ज करण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतूल आदे यांनी केले आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे लवकरच चारचाकी वाहनांसाठी ‘जेएक्स’ (JX) मालिका सुरु करण्यात येत आहे. ज्यांना चारचाकी वाहनांना हवा असणारा आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरुन हवा असेल त्यांनी विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. हा अर्ज आणि धनाकर्ष (डीडी) ६ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११ ते दुपारी २.३० दरम्यान कार्यालयाच्या परिवहन विभागात पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह जमा करणे आवश्यक राहील.
चारचाकी वाहन क्रमांकाची यादी ७ जानेवारी रोजी कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येणार आहे. यादीतील अर्जदारांना लिलावाकरीता जास्त रकमेचा डीडी जमा करायचा असेल तर त्यांनी ७ जानेवारी रोजी दुपारी २.३० पर्यंत सीलबंद पाकिटात कार्यालयात जमा करावा व त्याच दिवशी ३.३० वाजता परिवहन विभागात लिलाव करण्यात येईल.
डीडी ‘DY.R.T.O.PIMPRI CHINCHWAD’ या नावाने राष्ट्रीयकृत किंवा अनुसूचित बँकेचा पुणे येथील असावा. त्यासोबत अर्जदारास पॅनकार्डची साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक राहील. लिलावाकरिता जमा करण्यात येणारा डीडी हा एकाच सीलबंद पाकीटासह जमा करावा.
एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व भरलेले शुल्क शासनाच्या तिजोरीत जमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत करण्यात येणार नाही, असेही कळविण्यात आले आहे.










Leave a Reply