Pimpri News : कन्या विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
Pckhabar- रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय पिंपरी वाघेरे या शाळेत आज स्त्रियांच्या शिक्षणासाठी ज्ञानाची कवाडे खुली करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व कार्यक्रमाच्या अध्यक्षा शारदा शेटे यांचे हस्ते पुष्पांजली अर्पण करून झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीम . धादवड संगिता यांनी करताना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याची महती व्यक्त केली . यानंतर विद्यालयातील विद्यार्थीनी कु.अंजली सुरडकर, कु. थोरात वैष्णवी, कु सोनम हतरगे यांनी सावित्रीबाई फुले यांचे जीवनकार्य व स्त्री शिक्षणासाठी त्यांनी घेतलेले अविरत श्रम याविषयी माहिती सांगितली. तसेच कु. गीतांजली नागरे या विद्यार्थिनीने सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्याची महती सांगणारी ओवी सादर केली.
यानंतर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ शारदा शेटे यांनी – अज्ञानरुपी अंध:कारात चाचपडणाऱ्या स्त्रियांच्या जीवनास ज्ञानरुपी प्रकाश देऊन त्यांचे जीवन सुखी व समृद्ध करण्यासाठी स्वतः हालअपेष्टा सहन करत जो ज्ञान दानाचा यज्ञ सुरू केला तो आजही अव्याहतपणे सुरू आहे. आज स्त्रियांनी अनेक क्षेत्रात उंच भरारी घेतली आहे ती सावित्रीबाई फुले यांच्या कार्या मुळेच आहे, असे मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व अध्यापकवृंद , शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थीनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मीनल साकोरे यांनी केले. आभार प्रदर्शन सौ अनघा रांगणेकर यांनी व्यक्त करून कार्यक्रम संपन्न झाला.










Leave a Reply