Chikhali News : अतिक्रमणामुळे चिखली ते थरमॅक्स चौकात वाहतूक कोंडी

Chikhali News : अतिक्रमणामुळे चिखली ते थरमॅक्स चौकात वाहतूक कोंडी

Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहरात मोठे, प्रशस्त रस्ते, पदपथ आहेत. मात्र हे प्रशस्त रस्ते आणि पदपथ अतिक्रमणाच्या झाकून गेले आहेत. चिखली ते थरमॅक्स चौक या दरम्यानच्या रस्त्यावर वाहन धारक रस्त्यावर वाहने पार्क करतात. इथल्या पदपथांवर दुकानदार आणि लहान स्टॉल धारकांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन वाहतुकीस अडथळा होत आहे. याबाबत तात्काळ कार्यवाही करून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, चिखली ते थरमॅक्स चौक दरम्यानच्या रस्त्याच्या पदपथालगत अनेक दुकाने आहेत. त्यातील काही दुकानांनी अतिक्रमण करून पदपथावर दुकानातील विक्रीचे साहित्य ठेवले आहे. तर रात्रीच्या वेळी अनेक लहान स्टॉल धारक या पदपथावर आणि रस्त्यावर आपली दुकाने थाटतात. अनेकदा पादचारी नागरिकांना ये-जा करण्यासाठी पदपथ शिल्लक राहत नाही. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावर उतरून चालावे लागते.

रस्त्याच्या दोन्ही बाजूला, कुठेही वाहनांसाठी पार्किंगची सोय नाही. त्यामुळे वाहन धारक देखील त्यांची वाहने थेट रस्त्यावर पार्क करतात आणि खरेदीसाठी निघून जातात. रात्रीच्या वेळी तर अनेक वाहने रस्त्यावर पार्क केली जातात. वाहतुकीसाठी अत्यंत लहान रस्ता शिल्लक राहतो.

चिखली आणि आकुर्डीला जोडणारा हा प्रमुख रस्ता आहे. या रस्त्याने प्रवास करणा-या नागरिकांची संख्या लक्षणीय असते. चिखली, जाधववाडी आणि एमआयडीसीमध्ये जाण्यासाठी अनेक नागरिक या रस्त्याचा वापर करतात. रस्त्यात वाहने पार्क केल्याने प्रवासी नागरिकांना त्याचा त्रास होतो. तसेच वाहतूक कोंडी होते. यामुळे परिसरात अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाने या वाहतूक कोंडीवर, रस्त्यावरील पार्क होणा-या वाहनांवर आणि पदपथांवरील अतिक्रमणांवर तात्काळ कारवाई करावी. पादचा-यांना पदपथ आणि वाहन धारकांसाठी रस्ता मोकळा करून द्यावा, असेही निलेश नेवाळे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *