Pune District News : तळेगाव दाभाडे, लोणावळा, आळंदी नगरपरिषदेवर प्रशासक नेमण्यात येणार

Pune District News : तळेगाव दाभाडे, लोणावळा, आळंदी नगरपरिषदेवर प्रशासक नेमण्यात येणार

तळेगाव नगरपरिषदेच्या प्रशासकपदी प्रांत अधिकारी संदेश शिर्के यांची नियुक्ती

नगर विकास विभागाचे आदेश

Pckhabar- संपूर्ण जगभर पसरलेल्या साथरोग कोविड-१९ च्या राज्यात झालेल्या संक्रमणामुळे सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया वेळेवर पार पाडणे शक्य होत नाही. यामुळे मुदत संपत असलेल्या तळेगाव दाभाडे, लोणावळा, आळंदी यासह राज्यातील नगरपरिषदेवर प्रशासक नेमण्यात येणार आहे. याबाबत
नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी आदेश काढला आहे.

तळेगाव नगरपरिषदेच्या प्रशासकपदी प्रांत अधिकारी संदेश शिर्के यांची नियुक्ती

नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच 6 जानेवारी 2022 रोजी मुदत संपत असलेल्या तळेगाव दाभाडे नगरपरिषदवर प्रांत अधिकारी संदेश शिर्के यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. विद्यमान नगरसेवकांना मुदतवाढ दिली नाही. नगरपरिषदेची मुदत संपताच प्रांत अधिका-यांकडे पदभार देण्याचे आदेश राज्याच्या नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिका-यांना दिले आहेत.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील सदस्यांचा कार्यकाल 6 जानेवारी 2022 रोजी संपुष्टात येत आहे. 6 जानेवारीपासून नगरपरिषदेची सर्व सूत्रे प्रांत संदेश शिर्के यांच्याकडे जाणार आहेत.

कोरोनामुळे निवडणूक प्रक्रिया वेळेवर पार पडणे शक्य झाले नाही. त्यामुळे मुदत संपत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्यास आणखी कालावधी लागणार आहे. त्यासाठी मुदत समाप्तीनंतर स्थानिक संस्थांमध्ये प्रशासक नियुक्त करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे. त्यानुसार उपविभागीय अधिकारी (प्रांत), तहसीलदार, मुख्याधिकारी यांची नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या प्रशासकपदी नियुक्ती करण्यात येत असल्याचे पाठक यांनी म्हटले.

दरम्यान, लोणावळा नगरपरिषदेचा कारभार मुख्याधिकारी तर आळंदी नगरपरिषदेचा कारभार खेडचे तहसीलदार पाहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *