विना परवाना लोणावळा व मावळात पर्यटनासाठी येणार्यावर गुन्हे दाखल करा-सहाय्यक पोलीस अधिक्षक नवनित काँवत
Pckhabar- येत्या १५ ऑगस्ट रोजी व त्याला जोडून आलेल्या रविवारी, कोणी पर्यटक पर्यटनासाठी विना परवाना लोणावळ्यात किंवा मावळ तालुक्यातील अन्य पर्यटन स्थळांवर आले तर संबंधितांवर कडक कारवाई करीत गुन्हे दाखल करण्याचे आदेश लोणावळा
सहाय्यक पोलीस अधिक्षक नवनित काँवत यांनी दिले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळा शहर व मावळ तालुक्यातील सर्व पर्यटनस्थळांवर जाण्यास यावर्षी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. असं असतानाही आदेश धुडकावून, पोलिसांची नजर चुकवून याठिकाणी पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आतापर्यत 300 पर्यटकांवर लोणावळ शहरात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मुंबई पुण्यासह आता मावळ तालुका व लोणावळा शहरात देखील दैनंदिन कोरोना रुग्ण सापडू लागले आहेत. शासनाने लाॅकडाऊनचे निर्बंध कमी करण्यात आले असले तरी जिल्हाबंदी कायम ठेवली आहे. त्यामुळे मुंबई पुण्याहून तसेच इतर जिल्हे व राज्यांमधून लोणावळ्यात येताना विना परवाना आलात तर चेकपोस्ट नाक्यावरूनच पुन्हा माघारी जावे लागणार आहे. यानंतरही कोणी पर्यटनस्थळांपर्यत जाण्याचा प्रयत्न केला अथवा तसे आढळून आल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांन्वे संबंधितांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
सहाय्यक पोलीस अधिक्षक नवनित काँवत यांनी लोणावळा शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव, लोणावळा ग्रामीणचे संदीप घोरपडे, कामशेत पोलीस ठाण्याचे विठ्ठल दबडे, वडगाव मावळचे सुरेश निंबाळकर या सर्व अधिकार्यांना आपआपल्या कार्यक्षेत्रात शनिवार व रविवारी नाकाबंदी लावत पर्यटनस्थळे बंदी आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
मुंबईच्या दिशेने विनापास येणारी वाहने रोखण्यासाठी खालापूर टोलनाका, खंडाळा, रायवुड व नौसेना बाग येथे चेकपोस्ट लावण्यात आले आहेत. तर ग्रामीण पोलिसांनी वरसोली टोलनाका, कार्ला मळवली रस्ता, पवनानगर येथे बंदोबस्त नेमला आहे. कामशेत व वडगाव पोलिसांनी नाणेमावळ व आंदरमावळ भागातील पर्यटनस्थळांकडे जाणार्या मार्गावर चेकपोस्ट लावले आहेत.










Leave a Reply