Pimpri News : पिंपरी-चिंचवड परिसरात उद्यापासून मेगा ‘वॅक्सिनेशन ड्राइव्ह’
बजाज फिनसर्व्ह कंपन्या आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा पुढाकार

Pckhabar- बजाज फिनसर्व्ह लिमिटेड कंपन्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसह उद्या दि. १७ ते ३१ डिसेंबर २०२१ या काळात एक महा लसीकरण मोहीम घेणार आहेत. ही मोहीम, वायसीएमएचच्या यमुनानगर, तळेरा, सांगवी, जिजामाता, भोसरी आणि आकुर्डी या सहा प्रभागांतील, ६२ कोविड लसीकरण केंद्रांद्वारे (सीव्हीसी), घेतली जाणार आहे. पुण्यातील रहिवाशांच्या लसीकरणासाठी बजाज ग्रुपमधील बजाज फिनसर्व्ह लिमिटेड कंपन्या आणि बजाज ऑटो लिमिटेड यांनी यापूर्वीही पीएमसी, पीसीएमसी आणि जिल्हा परिषदेशी सहयोग करून पुण्याच्या शहरी व ग्रामीण भागात लसीकरणाच्या विशाल मोहिमा राबवल्या आहेत. ग्रुपने आत्तापर्यंत ८ लाखांहून अधिक कोविड-१९ लशी आणि ९ लाख सिरिंजेस देणगी स्वरूपात दिल्या आहेत आणि जास्तीत-जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे म्हणून जनतेला एकत्र करण्याच्या तसेच जागरूकता निर्माण करण्याच्या
मोहिमांमध्ये सहभाग घेतला आहे. डिसेंबर २०२१च्या अखेरीस १०० टक्के कोविड-१९ लसीकरण साध्य करण्यासाठी सरकार सध्या करत असलेल्या प्रयत्नांचा हा उपक्रम एक भाग आहे.
बजाज फायनान्स लिमिटेड, बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि बजाज अलायन्झ लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांनी, पीसीएमसीच्या हद्दीतील लस न मिळालेल्यांच्या लसीकरणासाठी, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला (पीसीएमसी) १.५० लाख डोस पुरवले आहेत. या सीएसआर आरोग्य उपक्रमाचे उद्दिष्ट पुणेकरांच्या आरोग्य व सुरक्षिततेचे संरक्षण करणे हे आहे.
बजाज फिनसर्व्ह लिमिटेडचे सीएसआर प्रमुख अजय साठे, या मोहिमेबद्दल म्हणाले, “आमच्या सीएसआर उपक्रमांचा एक भाग म्हणून, राज्य सरकारच्या यंत्रणांद्वारे चाललेल्या लसीकरण प्रयत्नांना सहाय्य करण्यासाठी, आम्ही पुण्याच्या शहरी व ग्रामीण भागात अनेक लसीकरण मोहिमा घेत आहोत. शहरातील १०० टक्के पात्र नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी व त्यांना कोविड-१९पासून संरक्षण पुरवण्यासाठी आम्ही शक्य त्या सर्व मार्गांनी प्रशासनाला मदत करण्यासाठी वचनबद्ध आहोत. पीसीएमसी या उद्दिष्टाप्रती करत असलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत आणि पुणे शहर सुरक्षित व निरोगी राखण्याच्या कामात त्यांना मदत करण्यास आम्ही उत्सुक आहोत.”
१७ ते ३१ डिसेंबर २०२१ या काळातील लसीकरण मोहिमेत नोंदी करण्यासाठी पात्र नागरिक www.cowin.gov.in किंवा www.bajajfinservhealth.in/cowin या वेबसाइट्सना भेट देऊ शकतात. याला पर्याय म्हणून ते स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांशीही मदतीसाठी संपर्क करू शकतात.










Leave a Reply