
Pckhabar- देशाचे संरक्षणदल प्रमुख ‘चीफ ऑफ डिफेन्स’ जनरल बिपीन रावत यांच्यासह त्यांचे कुटुंबिय व वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा 8 डिसेंबर रोजी हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. भारत मातेच्या या वीर सुपुत्रांना श्रध्दांजली वाहण्यासाठी तळेगावात आज ( रविवार) सायंकाळी साडेपाच वाजता कॅन्डल मार्च व श्रध्दांजली सभेचे जनसेवा विकास समितीच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.

तळेगाव दाभाडे स्टेशन भागातील यशवंत नगर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सायंकाळी साडेपाच वाजता कॅन्डल मार्च निघणार आहे. हा मार्च मराठा क्रांती चौक येथे येणार असून या ठिकाणी श्रध्दांजली सभा होणार आहे.

या कॅन्डल मार्चमध्ये जास्तीत जास्त तळेगावकर नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जनसेवा विकास समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, जनरल बिपीन रावत यांनी त्यांच्या लष्करीसेवेच्या प्रदीर्घ कारकिर्दीत गाजवलेलं शौर्य, पराक्रम, त्यांची देशभक्ती देशवासियांच्या कायम स्मरणात राहील. युवकांना सैन्यदलात दाखल होण्यासाठी प्रेरणा देईल. जनरल बिपीन रावत यांनी भारतीय लष्कराचे प्रमुख म्हणून देशाची संरक्षणसिद्धता, गौरव वाढवण्यात त्यांनी योगदान दिलं. लष्करप्रमुखपदानंतर तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांची, संरक्षणदलप्रमुख पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. पहिले संरक्षणदलप्रमुख तिन्ही सैन्यदलांमध्ये सहकार्य, समन्वय वाढवण्याचं काम केलं. प्रदीर्घ लष्करी सेवेत असंख्य लढाया, मोहिमा यशस्वी केल्या. युद्धात आघाडीवर राहून सैन्याचं नेतृत्वं केलं. सहकारी अधिकारी, जवानांचं मनोबल कायम उंच ठेवण्यासाठी प्रयत्नशील त्यांचं नेतृत्वं होतं. त्यांच्यासारख्या भारतमातेच्या वीर सुपुत्राचं झालेलं अपघाती निधन ही देशवासियांच्या मनाला चटका लावणारी, प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणणारी घटना आहे.











Leave a Reply