Dehugaon News : देहू नगरपंचायत निवडणूक: प्रभाग 11, 12, 14, 15 मधील निवडणूक स्थगित
आता फक्त 13 प्रभागातच निवडणूक होणार

Pckhabar-स्थानिक स्वराज्य संस्थांमधील होऊ घातलेल्या ओबीसी संवर्गातील जागेवरील निवडणुकीला राज्य निवडणूक आयोगाकडून स्थगिती मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. राज्यातील 106 नगरपंचायत मध्ये 1802 जागांसाठी निवडणूक होणार होती. आता त्यापैकी ओबीसींच्या 400 जागांच्या निवडणुकीला स्थगिती मिळाली असून देहू नगरपंचायतच्या प्रभाग क्रमांक 11,12, 14 आणि 15 मधील निवडणूकही स्थगित करण्यात आली आहे.
नव्याने निर्माण झालेल्या देहू नगरपंचायसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असतानाच ओबीसी संवर्गातील जागेवरील निवडणुकीला राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे देहू नगरपंचायतच्या आता 17 प्रभागापैकी 13 प्रभागामध्येच निवडणूक होणार आहे.
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाला धक्का देणारा एक मोठा निर्णय आज सुप्रीम कोर्टाने घेतला आहे. राज्य सरकारने ज्या अध्यादेशाद्वारे हे आरक्षण पुर्नस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. त्या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. जोपर्यंत राज्य सरकार या आरक्षणासाठीची आकडेवारी आणि गरज एखाद्या गठित आयोगाच्या माध्यमातून सिद्ध करत नाही तोपर्यंत हे असे आरक्षण लागू करता येणार नाही असे सुप्रीम कोर्टानं म्हटले आहे.











Leave a Reply