Pimple Gurav News : आता तुम्हीच सांगा आम्ही घराबाहेर पडायचं कसं ?

Pimple Gurav News : आता तुम्हीच सांगा आम्ही घराबाहेर पडायचं कसं ?

पावसातही रस्ते खोदून ठेवल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे झाले मुश्किल

जादा कामगार उपलब्ध करून कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत : माजी नगरसेवक राजेंद्र जगताप

Pckhabar-स्थानिक विद्यमान नगरसेवक आणि परिस्थितीचे गांभीर्य नसलेले अधिकारी यांच्यात ताळमेळ नसल्याने पिंपळे गुरवमधील अंतर्गत रस्त्याची कामे खोळंबली आहेत. भर पावसातही रस्ते खोदून ठेवल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. ही कामे जादा कामगार वापरून लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी केली आहे.

पिंपळे गुरवमध्ये अंतर्गत गल्ल्यांतील रस्त्यांची कामे सुरू आहेत. एकाच वेळी अनेक ठिकाणी कामे सुरू असल्याने कामे पूर्णत्वास जाण्यास विलंब होत आहे. ही कामे टप्पे पाडून केल्यास नागरिकांना त्रास सहन करावा लागणार नाही. मात्र, एका वेळी एकाच गल्लीतील रस्त्याची खोदाई करून जास्त कामगारांच्या साहाय्याने कामे लवकर पूर्ण करता येतील. आजघडीला मोरया पार्कच्या सर्वच गल्ल्यांमधील कामे अपूर्ण स्थितीत असताना आणि नागरिक दररोज समस्यांना सामोरे जात असताना लक्ष्मीनगर, भालेकर नगर, गुरुदत्तनगरमधील कामे सुरू केली आहेत.

भर पावसातही खोदाई सुरूच असल्याने भालेकरनगर, गुरुदत्तनगरमधील रस्ते चिखलमय झाले आहेत. या रस्त्यांवर अक्षरशः गाळ झाला आहे. खोदाई खोल असल्याने आणि चिखल खूप झाल्याने घरातील नागरिकांना घराबाहेर पडता येत नाही. अनेकजण घसरून चिखलात पडून जखमीही झाले आहेत. त्यामुळे नागरिकांची अक्षरशः त्रेधातिरपीट झाली आहे. या अंतर्गत रस्त्याची कामे पूर्ण करून नागरिकांना या गर्तेतून बाहेर काढण्यात यावे, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही राजेंद्र जगताप यांनी दिला आहे.

भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधींचे केवळ वसुलीकडे लक्ष आहे. त्यामुळेच नागरिकांच्या समस्यांकडे व लक्ष द्यायला यांना वेळ नाही. भाजप नेत्यांनी वसुलीपेक्षा सध्याच्या रस्त्यांच्या दुरावस्थेकडे लक्ष द्यावे. अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.
-राजेंद्र जगताप, माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *