Dehugaon News : देहूगावात HEALTH AWARENESS CYCLECYCLE RIDE ला उत्स्फूर्त प्रतिसाद

Dehugaon News : देहूगावात HEALTH AWARENESS CYCLECYCLE RIDE ला उत्स्फूर्त प्रतिसाद

11 वर्षांच्या मुलापासून 70 वर्षांच्या आजोबांचा सहभाग

Pckhabar- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम जनजागरण मोहिमे अंतर्गत INDO ATHLETIC SOCIETY व प्राथमिक आरोग्य केंद्र, देहू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या HEALTH AWARENESS
CYCLE RIDE ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या जनजागृती मोहिमेत 45 ते 50 सायकलस्वारांनी सहभाग नोंदविला.

स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त दि. 16 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर 2021 या कालावधीत असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत निदान व जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदलाबाबत विशेष मोहिम पुणे जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या अंतर्गत आज सकाळी (बुधवार) HEALTH AWARENESS
CYCLE RIDE चे आयोजन करण्यात आले होते. या RIDE ची सुरुवात गाथा मंदिरापासून होऊन प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सांगता झाली. यावेळी श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, सचिन करडे, मारूती सायकल आणि स्पोर्ट्सचे मारूती विधाटे, विक्रीकर निरीक्षक दिनेश कारके,
श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे मोहन काळोखे, IAS चे अध्यक्ष गजू दादा, भुजबळ साहेब,
देहूगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी चंद्रशेखर स्वामी, विलास तापकीर, श्री तिरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

विशेष म्हणजे या रॅलीमध्ये 11 वर्षांचा सार्थक मोहन दराडे, 12 वर्षांची साक्षी मोहन दराडे हे भाऊ- बहीण यांच्यासह 70 वर्षांचे एक आजोबा सहभागी झाले होते. यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.

याप्रसंगी सायकलस्वारांना मार्गदर्शन करताना श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा
काळ सारावा चिंतनें । एकांतवासी गंगास्नाने । देवाचें पूजन । प्रदक्षिणा तुळसीची ।।१।। युक्त आहार विहार । नेम इंद्रीयांचा सार । नसावी बासर । निद्रा बहु भाषण।।२।। परमार्थ महाधन । जोडी देवाचे चरण । व्हावया जतन । हे उपाय लाभाचे ।।३।। देह समर्पिजे देवा । भार कांही च न घ्यावा । होईल आघवा । तुका म्हणे आनंद ।।४।। हा अभंग सांगून जगद्गुरू तुकाराम महाराज सांगतात की काळ चिंतनात व्यतित करावा. एकांतात गंगास्नान करावं. देवाचं पूजन करावं. तुळशीला प्रदक्षिणा घालाव्या. युक्त आहार, विहार, इंद्रिये नियंत्रणात ठेवावीत. अतिनिद्रा, अतिबोलणे टाळावे, असे सांगून नितीन महाराज मोरे म्हणाले आपल्या आहारात भाजी-पाला जास्तीत जास्त असावा. आपल्या शरीरातच आनंद असून तो आपल्याला उपभोक्ता आला पाहिजे. संतांचे विचार अंमलात आणून चांगले जीवन जगावे. डॉ. किशोर यादव हे निस्वार्थी भावनेने कार्य करत असून देहूकरांचे हे भाग्य आहे. डॉ. मापुस्करांच्या नंतर देहूगावसाठी डॉ. यादव चांगले काम करत आहेत.

प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव म्हणाले, ”आजच्या धकाधकीच्या जीवनात आणि बदलत्या जीवनशैलीमुळे 30 वर्षावरील 100 पैकी 30 लोकांना डायबेटीस, उच्च रक्तदाब, तोंडाचा कर्करोग, महिलांमध्ये स्तनांचा कर्करोग, गर्भाशयामधील कर्करोग या पैकी एका तरी आजाराने व्यक्ती ग्रस्त असतेच. वेळीच तपासणी याचे निदान होते. अन्यथा अनेक जणांना आपल्याला आजार झाला हे माहितच नसते. त्यासाठीच ही जनजागृती फेरी काढण्यात आली आहे. नागरिकांमध्ये वेळीच जागृती होणे गरजेचे आहे. अन्यथा हे आजार बळावून शरीरासाठी धोकादायक होऊ शकतात”.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार 30 वर्षावरील लोकांचे पाच आजाराकरीता उच्च रक्तदाब, मधुमेह, तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगाचे आरोग्य केंद्रामध्ये तपासणी करण्यात येत आहे, अशी माहिती देहूगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *