Dehugaon News : गायरानची जागा पोलीस आयुक्तालयासाठी देऊ नका, अन्यथा आमरण उपोषण

Dehugaon News : गायरानची जागा पोलीस आयुक्तालयासाठी देऊ नका, अन्यथा आमरण उपोषण

जनजागृती सामाजिक मंचाचा इशारा
Pckhabar- देहूगाव हे श्री संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी असून महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रापैकी प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. संत तुकाराम महाराज बीज सोहळा, आषाढी पायी वारी पालखी सोहळा, वसंत पंचमी,  कार्तिकी वारी, अशा विविध महत्वाच्या वारीसह दरवर्षी देहूत लाखो भाविक येत असतात. आषाढीवारीमध्ये सुमारे 350 दिंड्या सहभागी होतात. आलेल्या वारकर्‍यांना दिंड्यांना विसाव्यासाठी देहूत जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे देहूतील गायरानची जमीन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी देण्याचा निर्णय रद्द करावा. अन्यथा या मागणीसाठी 6 डिसेंबर रोजी देहू नगरपंचायत कार्यालयाजवळ आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा जनजागृती सामाजिक मंचाच्या वतीने देण्यात आला आहे.

याबाबत जनजागृती सामाजिक मंचातर्फे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, देहूगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांच्यासह आदींना निवेदन देण्यात आले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, देहूगाव येथील गट नंबर 97 मध्ये 59 हेक्टर व 39 आर एवढी गायरान जमीन आहे. या जागेत अतिक्रमण होवू नये यासाठी ग्रामस्थ व सामाजिक संस्थांनी एकत्र येवून लोकसहभाग व लोकवर्गणीच्या माध्यमातून या गायरानामध्ये दोन लाख झाडे लावली आहेत.  गेल्या चार वर्षापासून हा उपक्रम चालू आहे. आतापर्यंत लावलेल्या झाडांची उंची सात ते आठ फुटापर्यंत झाली आहे.  महाराष्ट्राच्या पर्यावरणासाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेली व संपत आलेली ’देवराई’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची वृक्ष लागवड करण्यात आली आहे. या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता देहूला एकूण क्षेत्र 565 हेक्टर असून पैकी 230 हेक्टर क्षेत्र 1950 पूर्वी लष्कराच्या शस्त्रास्त्र भांडारसाठी संपादित केले आहे. एकूण क्षेत्रापैकी 30 हेक्टर बांधकामे आहेत. उर्वरीत क्षेत्र रेडझोनबाधित आहे.

देहूगाव महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रापैकी प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळा, आषाढी पायी वारी पालखी सोहळा, वसंत पंचमी,  कार्तिकी वारी, अशा विविध महत्वाच्या वारीसह दरवर्षी देहूत लाखो भाविक येत असतात. आषाढीवारीमध्ये सुमारे 350 दिंड्या सहभागी होतात. पालखी सोहळ्यासाठी वारकरी दोन दिवस अगोदरच देहूत दाखल होतात. तर वारकरी  गाथा पारायण, भजन व किर्तनाचे कार्यक्रम नित्यनियमाणे करीत असतात. मात्र देहूगावात दिवसेंदिवस नागरिकरण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वारकर्‍यांच्या तंबूसाठी जागाच उपलब्ध नाही. भविष्याचा विचार करता आणि दिवसेंदिवस वारीतील भाविकांची संख्या लक्षात घेता भक्तांना सुखसुविधा पुरविणे व त्याची सोय करणे स्थानिक प्रशासनास अडचणीचा सामना करावा लागणार आहे. वारकर्‍यांना दिंड्यांना विसाव्यासाठी देहूत जागाच उपलब्ध नसल्याने वारकर्‍यांसाठी गायरानाची जागा गरजेची आहे. देहू विकास आराखड्या अंतर्गत गायरानात वारकर्‍यांच्या सोयीसाठी कायमस्वरूपी शौच्छालय बांधण्यात आले आहे. तसेच शेजारीच मोठे वाहनतळही उभारण्यात आले आहे.

त्यामुळे देहू, विठ्ठलवाडी येथील गायरानची जमीन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी देण्याचा निर्णय रद्द करावा. अन्यथा या मागणीसाठी 6 डिसेंबर रोजी देहू नगरपंचायत कार्यालयाजवळ आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा जनजागृती सामाजिक मंचाच्या वतीने देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *