Chinchwad Crime News : ‘नाव कमविण्यासाठी’ आमदार बंधूंच्या कार्यालयावर फेकल्या ज्वलनशील पदार्थांनी भरलेल्या बाटल्या
तिघे जण पोलिसांच्या ताब्यात

Pckhabar- चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू, उद्योजक शंकर जगताप यांच्या कार्यालयावर मंगळवारी तिघांनी ज्वलनशील पदार्थांनी भरलेल्या दोन बाटल्या फेकल्या होत्या. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर आरोपींनी फक्त नाव कमविण्यासाठी हा प्रकार केल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले आहे.
राहुल राम साळुंके (वय 39, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर जगताप यांचे पिंपळे सौदागर येथे चंद्ररंग डेव्हलपर्स अँड बिल्डर्स प्रा ली हे कार्यालय आहे. मंगळवारी दुपारी एका मोपेडवरून तिघेजण आले. त्यातील दोघांनी कार्यालयावर कार्यालय नष्ट करण्याच्या उद्देशाने ज्वलनशील पदार्थ भरलेल्या दोन बाटल्या फेकून मारल्या. मात्र, एक बॉम्ब कार्यालयाच्या समोर असलेल्या इलेक्ट्रिक डीपीवर पडला. तर दुसरा रस्त्यावर पडला आहे. सुदैवाने हा बॉम्ब कार्यालयावर पडला नसल्याने घटनेत कुणीही जखमी झालेले नाही. शंकर जगताप आणि त्यांच्या कार्यालयात काम करणारा स्टाफ यावेळी कार्यालयात हजर होते. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन आरोपींच्या शोधासाठी तपास पथके रवाना केली होती. आज सकाळी (बुधवार) तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपींकडे चौकशी केल्यानंतर आरोपींनी फक्त नाव कमविण्यासाठी हा प्रताप केल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले आहे. पोलीस निरीक्षक तांबे तपास करत आहेत.











Leave a Reply