Pimpri political News : राज्यात तुमचे सरकार, पालिकेत भ्रष्टाचार झाला असेल तर चौकशी करा : माजी खासदार किरीट सोमय्या

Pckhabar-पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्मार्ट सिटीमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सातत्याने होत आहे. याबाबत कोणतेही पुरावे दिले जात नाहीत. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी याबाबत पत्र दिले होते. मी त्यांच्याकडे पुरावे मागितले असता त्यांनी पुरावे दिले नाही. राज्यात त्यांचे सरकार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराची कागदपत्रे, पुरावे असतील तर ते चौकशी का लावत नाहीत. घोटाळा झाला असेल तर चौकशी करा, असे आव्हान भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या रविवारी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकारला दिले.
भाजपचे माजी खासदार सोमय्या आज (रविवार) शहरात भाजप नगरसेवक, पदाधिकारी, शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुखांशी संवाद साधण्यासाठी शहर भाजपच्या कार्यालयात आले होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, महापौर माई ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके, उपमहापौर हिराबाई घुले आदी उपस्थित होते.
सोमय्या म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे. खासदार संजय राऊत यांनी याबाबत मला पत्र दिले. त्यासोबत त्यांनी 17 ते 18 पेपर दिले. त्यात ईडी संबंधित एकही पत्र नव्हते. तर त्यातील सहा पत्र ही पिंपरी-चिंचवड मधील शिवसेना पदाधिकार्यांनी दिलेल्या तक्रारींची होती. शिवसेना पदाधिकार्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनाही दिलेली पत्रे आहेत. ईडीकडे तक्रार करण्यासाठी भ्रष्टाचार झाल्याबाबत काही ठोस कागदपत्रे, पुरावे लागतात. कागदपत्रे नसतील तर ईडीकडे तक्रार कशी करणार, असेही सोमय्या म्हणाले.











Leave a Reply