Dehugaon Article: देहूगाव नगरपंचायतचा पहिला नगरसेवक होण्यासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी !

सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचाराचा ‘श्रीगणेशा’
Pckhabar- पुणे जिल्ह्यातील नव्याने निर्माण झालेल्या देहूगाव नगरपंचायतचे प्रथम नगरसेवक होण्यासाठी इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. सर्वच राजकीय पक्षातील इच्छुकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचाराचा ‘श्रीगणेशा’ केला आहे. ‘लक्ष्य देहूगाव नगरपंचायत 2021-2022‘, प्रभागाचा क्रमांक आणि छबी अशा आशयाचे फेसबुक, व्हाट्सऍप संदेश फिरू लागले आहेत.
देहूगाव ग्रामपंचायतीचे रुपांतर 8 डिसेंबर 2020 रोजी नगरपंचायतीमध्ये झाले आहे. निवडणूक आयोगाने नगरपंचायतची आरक्षण सोडत, प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर केल्याप्रमाणे शुक्रवारी आरक्षण आणि प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. 17 प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये 9 महिला आणि 8 पुरूषांना नगरसेवक होण्याची संधी मिळणार आहे.
नगरपरिषदेचा पहिला नगरसेवक होण्याची अनेकांची इच्छा होती. मात्र, काही मातब्बर नेत्यांचे प्रभाग आरक्षित झाल्यामुळे त्यांचा हिरमोड झाला आहे. मात्र, आपल्या सौभाग्यवतीसाठी राजकीय फिल्डिंग लावण्यास सुरूवात केली आहे. तर काहींनी ”अभी नही तो कभी नही” याप्रमाणे ऐनवेळी प्रभाग बदलून निवडणूक लढण्याची तयारी सुरु केली आहे.
महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढविणार?
यापुर्वी देहू ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. ग्रामपंचायत निवडणूक ही पॅनेल करून लढवली जाते. मात्र, आता देहूत नगरपंचायत झाल्याने ही निवडणूक पक्षाच्या चिन्हावर होणार आहे. राज्यात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि कॉंग्रेस या तीन पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे नगरपंचायत निवडणूकीत तीन पक्ष एकत्र येतात की स्वतंत्र निवडणूक लढवतात, हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शिवसेनेचे श्रीरंग बारणे खासदार तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील शेळके आमदार आहेत.
शिवसेनेच्या शैला खंडागळे जिल्हा परिषदेच्या सदस्या म्हणून 2019 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत निवडून आल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या हेमलता काळोखे हवेली पंचायत समितीत निवडणून आल्या आहेत. त्यांनी पंचायत समितीचे सभापतीपद देखील भूषविले आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची चांगली ताकद आहे. देहूगावात भारतीय जनता पक्षाचेही चांगले प्राबल्य आहे. भाजपही एकहाती सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तर एकचा प्रभाग असल्याने प्रमुख राजकीय पक्षाकडून तिकीट न मिळाल्यास काही इच्छूक अपक्ष म्हणूनही आपले नशीब आजमावणार असल्याचे बोलले जात आहे.
याबाबत देहूगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश हगवणे म्हणाले ” राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस अशा तिन्ही पक्षाचे महाविकास आघाडी सरकार आहे. मात्र, देहूगाव नगरपंचायत निवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढवायची की स्वतंत्र याबाबत मावळचे आमदार सुनिल शेळके आणि पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. अण्णा जे निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल”.
– संपादक
PCKHABAR. COM











Leave a Reply