Editorial : निवडणूक महासंग्रमापूर्वी मतदारांची दिवाळी गोड!

Editorial : निवडणूक महासंग्रमापूर्वी मतदारांची दिवाळी गोड!

Pckhabar- आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका, तळेगाव दाभाडे नगरपरिषद, देहूगाव नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या उत्सवात आपल्यालाच कशाप्रकारे जास्तीत जास्त मते मिळतील, या उद्देशाने आजी-माजी अन् भावी ‘सन्माननीयां’नी सुरू केलेल्या मोर्चेबांधणीमुळे मतदारांची खऱ्या अर्थाने ‘दिवाळी’ सुरू झाली आहे. शुभेच्छापत्रे उटणे-पणत्यांपासून दिवाळी फराळाचे किट आणि दिवाळी अंकांपर्यंतच्या भेटवस्तू मतदारांना ‘घरोघरी’ पुरविल्या जात आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेसह तळेगाव दाभाडे नगरपरिषद, देहूगाव नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक आगामी काळात होणार आहे. सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा बनविण्याचे काम सुरू आहे. प्रशासना पाठोपाठ इच्छुक सन्माननीय तयारीला लागले आहेत. निवडणुकांत उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न जोरात सुरू असतानाच, मतदारांमध्ये जनसंपर्क वाढविण्यासाठीही इच्छुकांची चढाओढ सुरू आहे. आता दिवाळीच्या निमित्ताने थेट मतदारांच्या दारात जाण्याची संधी आजी माजी-भावींना मिळाली आहे.

दिवाळी शुभेच्छा देण्याच्या बहाण्याने फराळ, उटणे यांसह विविध भेटवस्तूंचे वाटप सुरू केले आहे. सध्या दिवाळी फराळाचा सरंजाम घरोघरी पोहोचविण्याची लगबग सुरू आहे. नाही म्हणायला फराळाच्या या किटची किंमत तीनशेपासून 500 रुपयांपर्यंत आहे. तेवढे बजेट नसलेल्यांनी मतदारांपर्यंत फक्त शुभेच्छा आणि पणत्याच पोहोचत्या केल्या आहेत. साखर, उटण्याची पाकिटेही घरोघरी टाकण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ सुरू आहे.

कोरोनाकाळात अनिश्चितता निर्माण झाल्याने भूमिगत झालेले इच्छुक नव्या जोमाने कामाला लागले आहेत. गेल्या काही दिवसांत माजी नगरसेवक आणि धनदांडगे इच्छुक प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत. निवडणुकीपूर्वी दिवाळी आल्याने नेतेमंडळी आता मतदारांची दिवाळी ‘गोड’ करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. दिवाळीनिमित्ताने अनेक इच्छुकांनी पुन्हा जनसंपर्क मोहीम राबविण्यासाठी आडाखे आखले आहेत. कार्यकर्ते आता घरोघरी फिरून आपल्या नेत्याच्या शुभेच्छा मतदारांना भेटवस्तूंच्या स्वरूपात देत आहेत. तर, नगरसेवक आणि इच्छुकांच्या कार्यालयांमध्ये पणत्या, दिवाळी फराळाचे जिन्नस आणि भेटवस्तूंचा खच पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दिवाळीमधील प्रत्येक संधीचे सोने करण्यासाठी ‘सन्माननीय’ प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत.

अनेक आजी-माजीकडून वसुबारसला गाय-वासरू उपलब्ध करून दिली जाणार आहेत. नुकतीच धार्मिक स्थळे सर्वसामान्यांसाठी खुली झाली आहेत. त्यामुळे दिवाळी सुट्ट्यांच्या निमित्ताने अनेक इच्छुकांनी मतदारांना देवदर्शन, फिरण्यासाठी बाहेर नेण्याच्या योजना आखल्या आहेत. निवडणुकीची चाहूल लागल्याने पिंपरी-चिंचवड, देहूगाव आणि तळेगाव दाभाडे शहरामध्ये फलकबाजीला उधाण आल्याचे चित्र आहे. अनेक बेकायदा फलकांमुळे शहराचे विद्रूपीकरण सुरू आहे.

कोरोनाची जागतिक महामारी अद्याप संपली नसून नागरिकांनी आपल्या परिवाराची काळजी घेऊन दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करावा. दिव्यांच्या प्रकाशाप्रमाणे आपले आयुष्य प्रकाशमय होण्यासाठी Pckhabar. Com च्या वाचकांना, जाहिरातदाराना, हितचिंतकांना आजपासून सुरू होणाऱ्या दिवाळी सणाच्या खूप खूप शुभेच्छा!!

PCKHABAR. COM
संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *