Bopodi News : लेझीम हा उपयुक्त क्रीडाप्रकार : उपमहापौर सुनीता वाडेकर


‘चला लेझीम खेळू या’ पुस्तकाचे प्रकाशन
Pckhabar- “विद्यार्थी आणि तरुणांसाठी लेझीम हा उपयुक्त क्रीडाप्रकार असूनही आता तो शाळांमध्ये शिकवला किंवा खेळला जात नाही!” अशी खंत पुणे महापालिका उपमहापौर सुनीता वाडेकर यांनी डॉ. राजेंद्रप्रसाद विद्यालय, बोपोडी येथे शनिवारी व्यक्त केली.

सेवानिवृत्त मुख्याध्यापक कुंडलिक जाधव लिखित ‘चला लेझीम खेळू या’ पुस्तकाचे प्रकाशन करताना सुनीता वाडेकर बोलत होत्या. पुणे महापालिका शिक्षण मंडळाचे पर्यवेक्षक (निवृत्त) द. अ. मेवेकरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक राज्य शिक्षण मंडळ अध्यक्ष (निवृत्त) शकुंतला काळे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. दिलीप गरुड, पीएमटीचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, महाराष्ट्र राज्य माजी सहशिक्षण संचालक अशोक राजगुरू, सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचारी संस्थाध्यक्ष विठ्ठल पोटे, पुणे महापालिका क्रीडा अधिकारी राजेंद्र दुमणे, माजी नगरसेविका शैलजा खेडेकर, हरी जगताप यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

शकुंतला काळे यांनी आपल्या मनोगतातून, “एखादे अपत्य जन्माला घालावे इतक्या कळा पुस्तकनिर्मितीसाठी सोसाव्या लागतात. शिक्षक हा आयुष्यभर विद्यादान करीत असतो, याचा उत्तम वस्तुपाठ म्हणून कुंडलिक जाधव यांच्या लेखनाकडे पाहावे लागेल!” असे विचार मांडले.
डॉ. दिलीप गरुड यांनी, “प्रासादिकता, सुबोधता, वर्णनाला चित्रांची जोड ही उत्तम साहित्याची वैशिष्ट्ये ‘चला लेझीम खेळू या’ या पुस्तकात आहेत!” असे गौरवोद्गार काढले. लेखक कुंडलिक जाधव यांनी आपल्या कृतज्ञतापर मनोगतातून, “संगीताची साथ असलेला लेझीम हा एकमेव खेळ आहे. आपल्याला अवगत असलेले ज्ञान आणि कौशल्य भावी पिढीला शिकवावे, या हेतूने पुस्तकाचे लेखन केले!” अशा भावना व्यक्त केल्या.

अध्यक्षीय मनोगतातून द. अ. मेवेकरी यांनी, “लेझीम हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अतिशय लोकप्रिय अन् महत्त्वाचा खेळ होता. त्याचे पुनरुज्जीवन होणे गरजेचे आहे!” असे मत मांडले. या प्रसंगी शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवर आणि कुंडलिक जाधव यांचे माजी विद्यार्थी यांची श्रोत्यांमध्ये उपस्थिती होती.
दीपप्रज्वलन, सरस्वतीपूजन आणि शारदास्तवनाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. प्रकाशन समिती आणि सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक कल्याण संस्था (बोपोडी शाखा) यांनी संयोजन केले. किसनमहाराज चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. नरेंद्र पाटील यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.










Leave a Reply