Dehugaon News : जगद्गुरु संत तुकाराम महाराज स्पर्धा परीक्षा अभियानाचे आयोजन
श्रीक्षेत्र देहूच्या अभंग इंग्लिश स्कूलमध्ये 7 नोव्हेंबरला होणार
प्रथम येणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना 100 टक्के शिष्यवृत्तीचा स्त्युत्य उपक्रम

Pckhabar- सृजन फाउंडेशनचे अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल, देहू व द्रोणाचार्य एज्युकेशन ॲकॅडमी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने MPSC आणि UPSC स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व व्यक्तिमत्व विकास केंद्र श्रीक्षेत्र देहूच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये सुरू केले जात आहे. या माध्यमातून ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करून अशा विद्यार्थांना स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण व योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठीच हे प्रशिक्षण केंद्र सुरू केले जात आहे.
सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना गुणवत्ता असूनही केवळ योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षणाच्या अभावी स्पर्धा परीक्षेतील यशापासून वंचित राहावे लागते, हे लक्षात घेऊनच हे अभ्यास केंद्र सुरु करण्यात येत आहे. या अभ्यास केंद्रामध्ये अनुभव समृद्ध, ज्ञान समृद्ध प्रशिक्षक वृंद, अद्ययावत सुसज्ज व्यवस्थेसह ग्रंथालय सुविधा उपलब्ध असणार आहे अशी माहिती सृजन फाऊंडेशनचे सचिव प्रा. विकास कंद व द्रोणाचार्य एज्युकेशन ॲकॅडमीचे मुख्य व्यवस्थापक प्रा. जयंत सावंत यांनी दिली.
याप्रसंगी अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर, सृजन फाऊंडेशनचे संचालक श्री प्रशांत काळोखे, श्री सौरभ कंद व कोमल कंद उपस्थित होते.
या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियाना अंतर्गत रविवार, दि. 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते 11 या कालावधीत अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.
सामान्यज्ञान, बुद्धिमापन चाचणी व MPSC पूर्व परीक्षेशी संबंधित विषयांवर आधारित एकूण 50 प्रश्नांसाठी 100 गुण असे परीक्षेचे स्वरूप असेल. शिष्यवृत्ती अभियान परीक्षेमध्ये प्रथम येणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना 100 टक्के शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. या तीन विद्यार्थ्यांपैकी दोन महिलांना संधी देण्यात येईल. द्वितीय येणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना 50 टक्के शिष्यवृत्ती देण्यात येईल. यामध्येही तीन पैकी दोन महिलांना संधी देण्यात येईल. आणि तृतीय येणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना 30 टक्के शिष्यवृत्ती देण्यात येईल. यामध्येही तीन पैकी दोन महिलांना संधी देण्यात येईल. विशेष म्हणजे दिव्यांग व शेतकरी कुटूंबातील होतकरू, गरीब विद्यार्थ्यांसाठी 10 टक्के सवलत देण्यात येणार असून इतर विद्यार्थ्यांना अत्यल्प शुल्कामध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
दि.15 नोव्हेंबर 2021 पासून रोज संध्याकाळच्या वेळेमध्ये या स्पर्धा परीक्षेच्या बॅचेस सुरू होणार आहेत. तरी देहू पंचक्रोशी व परिसरातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल व द्रोणाचार्य एज्युकेशन ॲकॅडमीचे वतीने करण्यात आले आहे.










Leave a Reply