Bhosari News : बाविसावे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन भोसरीत

Bhosari News : बाविसावे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन भोसरीत

Pckhabar- राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी या संस्थांच्या वतीने इंद्रायणीनगर, भोसरी येथील प्रीतम प्रकाश महाविद्यालयामध्ये 27 ऑक्टोबर 2021 रोजी बाविसावे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे आणि स्वागताध्यक्ष प्रा. डॉ अशोककुमार पगारिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पिंपरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेला संगीता झिंजुरके, प्रकाश रोकडे, प्रकाश जवळकर,  प्राचार्य सदाशिवराव कांबळे, रो. रामदास जैद, प्रशांत रोकडे आदी उपस्थित होते.

साहित्यिक प्रा. चंद्रकांत वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी दहा वाजता ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. डॉ. विजय ताम्हाणे आणि डॉ. अरुण आंधळे यांची प्रमुख उपस्थिती राहील. यावेळी वानखेडे यांच्या ‘बंधुतेची भाषा’ या पुस्तकाचे प्रकाशन, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य पुरस्कारांचे वितरण होईल.

दुपारच्या सत्रात ज्येष्ठ कवी विलास ठोसर (अकोट) यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे ‘काव्यपंढरी’ कविसंमेलन होईल. ज्येष्ठ कवयित्री मधुश्री ओव्हाळ या स्वागतप्रमुख असतील, संगिता झिंजुरके सूत्रसंचालन करतील. यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कवींचा सहभाग राहील.

यावेळी डॉ. नयनचंद्र सरस्वते यांच्या ‘बयो कविते…’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन होईल. याप्रसंगी बबन धूमाळ यांना लोककवी वामनदादा कर्डक, कवी आणि दै. सकाळचे ज्येष्ठ पत्रकार पितांबर लोहार यांना लोकगायक प्रल्हाद शिंदे, दिनेश भोसले यांना नामदेव ढसाळ काव्य पुरस्काराने सन्मानित केले जाईल.

सायंकाळी राष्ट्रीय बंधुता पुरस्कार वितरणाने संमेलनाचा समारोप होईल. माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे आणि वंचित विकास संस्था पुणे यांना यावर्षीचा राष्ट्रीय बंधुता पुरस्कार प्रदान केला जाईल. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रोख पाच हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

यावेळी 17 गुरुजनांना साने गुरुजी मूल्यजागर पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. याप्रसंगी रोटरी क्लबचे प्रांतपाल पंकज शहा, प्रकाश जवळकर आणि वंचित विकास संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा यांची प्रमुख उपस्थिती राहील. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी परिषदेचे सरचिटणीस शंकर आथरे, रो. रामदास जैद आणि प्राचार्य सदाशिव कांबळे यांनी विशेष पुढाकार घेतला आहे.

राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन दरवर्षी दोन दिवस आठ सत्रांमध्ये होते. मात्र कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन यावर्षी एक दिवस होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *