Lonavala News : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटात सहा वाहनांच्या विचित्र अपघातात तीन ठार, सहा जखमी

Lonavala News : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटात सहा वाहनांच्या विचित्र अपघातात तीन ठार, सहा जखमी


Pckhabar- मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटातील खोपोली एक्झिट जवळील तीव्र उतारावर सहा वाहने एकमेकांना धडकून झालेल्या विचित्र व भीषण अपघात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, सहाजण जखमी झाले आहे. हा अपघात सोमवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास झाला आहे. या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक काही विस्कळीत झाली होती.

रोनक मोरदानी (वय-२८, रा.खार, पश्चिम मुंबई), इर्शाद सिद्दीकी (वय-३०, रा.बांद्रा, मुंबई) व इसरार अहमद खान (वय-४०, सध्या रा.वडाळा, मूळ उत्तर प्रदेश) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. रोनक मोरदानी व इर्शाद सिद्दीकी हे दोघे होंडा ॲमेझ कार मधील प्रवासी होते तर इसरार खान हा कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोचा चालक होता.

जखमींमध्ये राजेश जोखुराम सरोज (वय-४७, रा.वडाळा, मुंबई), ताजुद्दीन मलिक खान (रा.वडाळा, मुंबई), अक्रम (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे असून, इतर तिघांची नावे समजली नाही.

बोरघाट (दस्तुरी) महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्याहून मुंबईकडे भरधाव वेगात जाणाऱ्या कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पो (क्रमांक-एमएच-४६/बीबी-२०६२) चालकाचे येथील तीव्र उतारावर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने तो टेम्पो पुढे जाणाऱ्या एका हुंदाई कारला (क्रमांक-एमएच-१४/जीडी-२९६१) धडकून नंतर पुढे भाजीची वाहतूक करणाऱ्या टाटा टेम्पोवर (क्रमांक-एमएच-१४/जीडी-६१७६) जोरात धडक देत त्यापुढे वैभव ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बसवर (क्रमांक-एमएच-०९/एफएल-६००३) जोरात धडकून दुसऱ्या लेनवर गेला. अन् या दरम्यान मागून आलेली होंडा ॲमेझ कार (क्रमांक-एमएच- ०२/एफई-४३११) हि त्या कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोला मागून धडकली. होंडा ॲमेझ कारमधील दोन्ही ‌‌ प्रवाशांच्या दुर्दैवाने त्यांच्या कारच्या मागून काळ म्हणून ज्योती ट्रान्सपोर्टचा लोखंडी कॉईलची वाहतूक करणारा ट्रेलर (क्रमांक-एमएच-४६/बीएम-०९०२) हा

होंडा ॲमेझ कारला मागून जोरात धडकल्याने कार कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पो आणि ट्रेलरच्या मध्ये पूर्णपणे चिरडून कारचा चुराडा झाला. या दुर्दैवी घटनेत होंडा ॲमेझ मधील दोन तरूणांसह  कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला तर. अन्य वाहनातील सहाजण किरकोळ जखमी झाले आहेत.

महामार्गाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी, पोलीस उपनिरीक्षक महेश चव्हाण आणि त्यांचे‌ कर्मचारी तसेच आयआरबी कंपनी, डेल्टा फोर्स व देवदूत आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी करून अपघात ग्रस्त वाहनांमध्ये अडकलेल्या जखमी प्रवाशांना व मृतांना बाहेर काढले. जखमींना तत्काळ उपचारासाठी नजिकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर मार्गावरील अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला करत मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी अपघातास कारभुत ठरल्याप्रकरणी कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पो चालकाच्या विरोधात खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास खोपोली पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *