Pimpri Political News : गुन्हेगारीत गुंतलेल्या लोकांना पंच अन् चांगल्या लोकांना खोट्या गुन्ह्यात अडकविले जातेय : शरद पवार

Pckhabar- माजी मुख्यमंत्री आणि एक माजी खासदार बोलतात, आरोप करतात. त्यानंतर लगेच ईडी, सीबीआय, आयकर विभाग, एनसीबीची कारवाई सुरू होते. हे केंद्र सरकारकडून यंत्रणाचा किती प्रमाणात दुरूपयोग होतोय, याचे उदाहरण आहे. केंद्र सरकारने याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे. सीबीआयला कोणत्याही राज्यात कारवाई करायची असेल तर राज्य सरकारची पूर्व परवानगी घ्यावी लागते. अलीकडे एखाद्या घटनेचे धागेदोरे महाराष्ट्रात दाखवून यंत्रणेचा गैरवापर करुन सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो. एनसीबी गुन्हेगारांना पंच करते. गुन्हेगारीत गुंतलेल्या लोकांना पंच म्हणून घ्यायचे आणि चांगल्या लोकांना खोट्या गुन्ह्यात अडकविले जाते. पंच असलेला किरण गोसावी यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती पुढे आल्यानंतर तो कोणत्याही यंत्रणेला सापडत नाही, असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर निशाना साधला.
शरद पवार दोन दिवसाच्या पिंपरी-चिंचवड दौर्यावर आहेत. (शनिवारी) आकुर्डी येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर आझम पानसरे, योगेश बहल, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नाना काटे यांच्यासह आदी पदधिकारी यावेळी उपस्थित होते.
पवार पुढे म्हणाले, केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडून ईडी, सीबीआय, आयकर विभाग, एनसीबी या संस्थेचा सातत्याने गैरवापर केला जात आहे. ज्या राज्यात भाजपची सत्ता नाही. त्या राज्यातील सरकारला यंत्रणेच्या माध्यमातून अस्थिर करण्याचे सूत्र अवलंबले जात आहे. ईडी, सीबीआयचा वापर करुन लोकप्रतिनिधींना दडपणात ठेवले जाते. मंत्री, खासदारांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला जातो.
राज्यातील मंत्र्यांवर ’ईडी’च्या माध्यमातून दबाव आणण्याचे काम केले जात आहे. शिवसेनेच्य खासदार भावना गवळी यांच्या संस्थांवर छापे टाकले. मंत्री अनिल परब यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावला. विधीमंडळात भाजपचे 20 वर्षे नेतृत्व केलेल्या एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडताच त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. त्यांच्या विरोधात खटले सुरु झाले. अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरी आयकर विभागाने छापे टाकले. पाच दिवस 14 ते 15 अधिकारी घरी चौकशी करत होते. हे गंभीर आहे. चौकशी करावी त्याला हरकत नाही. पण, चौकशी झाल्यानंतरही अधिकार्यांना घरीच थांबायला सांगितले. हे चुकीचे आहे. या छापेमारीतून काही निष्पन्न होणार नाही असे सांगत पवार म्हणाले, ’’किती पैसे सापडले यावर छापा टाकणार्यांनी, त्यांच्या प्रवक्त्यांनी भाष्य केले तर समजू शकतो. पण, भाजपचे नेते पुढे येऊन माहिती देतात, खुलासे करतात. याचा अर्थ आकसाने कारवाई केली जातेय, असेही पवार म्हणाले.






Leave a Reply