Pimpri Political News : उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा नव्हती : ज्येष्ठ नेते शरद पवार

Pckhabar- दोन वर्षांपुर्वी आम्ही राज्यात तीन पक्षांचे सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा 2-3 नावे समोर आली होती. माझे जुने मित्र बाळासाहेब ठाकरे यांच्याशी आपले जिव्हाळ्याचा संबंध होते. मुख्यमंत्री होण्याची उध्दव ठाकरे यांची अजिबात इच्छा नसताना दिलदार मित्राच्या चिरंजीवाला आपण मुख्यमंत्रीपदासाठी सक्तीने हातवर करत त्यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे ठाकरे यांना स्वतः मुख्यमंत्री व्हायचे होते, या देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपात तथ्य नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. तसेच माझी फडणवीस यांना हात जोडून विनंती आहे की त्यांनी चुकीचे आरोप करू नये, हे योग्य नाही, असेही ते म्हणाले.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार यांच्या नेतृत्वाखाली आजी-माजी नगरसेवकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तत्पुर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भाजपने शब्द पाळला असता तर शिवसैनिकाला मुख्यमंत्री करून मी बाजूला झालो असतो, असे म्हटले होते. यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेचे देवेंद्र फडणवीस यांनी शिवसैनिकाला नव्हे तर उध्दव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, असे म्हणत ठाकरे यांच्यावर निशाना साधला होता. याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले मी स्वतः सत्ता स्थापन करताना त्यात हस्तक्षेप केला होता. जेव्हा चर्चा सुरू होती की नेतृत्व कोणाकडे द्यायचं. त्यावेळी 2-3 नावे समोर आली. तर ठाकरे यांना अजिबात मुख्यमंत्री व्हायचे नव्हते. मी उद्धव ठाकरे यांचे हात वर केले, त्यांच्या ध्यानीही नव्हतं अन् मनीही नव्हते. मीच म्हटलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील. तेव्हा सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं. माझी फडणवीस यांना हात जोडून विनंती आहे की असे आरोप करू नका. हे योग्य नाही. स्वतः फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बरेच काही माहिती आहे, असेही पवार म्हणाले.
सरकारमधील काही मंत्र्यांकडे वसुली करण्यासाठी सॉफ्टवेअर असल्याचे फडणवीस म्हणाले होते. या आरोपालाही पवार यांनी उत्तर दिले असून वसुलीची चीप अथवा सॉफ्टवेअर असेल तर त्यांनी दाखवावे. आमच्या ज्ञानामध्ये भर पडेल. मात्र, ते मुख्यमंत्री होते, पण त्या पदाला एक मान-सन्मान आहे. मी पण त्या पदावर होतो. मात्र, त्या पदाला फडणवीस धक्का पोहचवत आहेत. मला फडणवीस यांच्याकडून हे अपेक्षित नव्हते.






Leave a Reply