Pune District News : हात धुण्याची सवय ही जीवनाचा अविभाज्य भाग बनावी : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

ही बातमी शेअर करा.

Pune District News : हात धुण्याची सवय ही जीवनाचा अविभाज्य भाग बनावी : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

जागतिक हात धुवा दिनानिमित्त स्वच्छता सप्ताहाचे आयोजन

Pckhabar- वेळोवेळी हात धुण्याचे महत्त्व आपल्याला कोरोना काळात लक्षात आले असून ही सवय आता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली पाहिजे. त्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी शहरात तसेच गावोगावी जात जनतेला हात धुण्याचे महत्त्व पटवून द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.

विभागीय आयुक्त कार्यालय येथे जागतिक हात धुवा दिन आणि स्वच्छता सप्ताह उपक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी डॉ. देशमुख बोलत होते. यावेळी यशदाचे उपमहासंचालक मल्लिनाथ कलशेट्टी, विभागीय आयुक्तालयाचे महसूल उपायुक्त संतोष पाटील, पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त अजित देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे अपर मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद टोणपे, सुलभ इंटरनॅशनलच्या प्रमुख श्रीमती नीरजा, रामनरेश झा आदी यावेळी उपस्थित होते.

डॉ. देशमुख पुढे म्हणाले, 80 ते 90 टक्के आजार हे नाका- तोंडाद्वारे विषाणू, जिवाणू आदी गेल्यामुळे होतात. ते रोखण्यासाठी आपले हात स्वच्छ असणे आवश्यक आहे. त्यामुळे वेळोवेळी हात धुण्याचे महत्त्व जनजागृतीद्वारे सर्वांना पटवून दिले जावे.

श्री. कलशेट्टी म्हणाले, हात धुण्याचे महत्त्व लक्षात यावे यासाठी जागतिक स्तरावर 15 ऑक्टोबर रोजी हात धुवा दिन साजरा केला जातो. कोरोनाला रोखण्यासाठी मास्क लावणे, सुरक्षित अंतर राखणे याचबरोबर वेळोवेळी हात धुणे या आरोग्यदायी सवयीचे महत्त्व सर्व जगात बिंबवले जात आहे. पुणे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका, सर्व नगरपरिषदा, पुणे जिल्हा परिषदेमार्फत 14 ते 22 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता सप्ताह उपक्रम राबवला जाणार असून आरोग्यदायी सवयींबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

कार्यक्रमादरम्यान शास्त्रशुद्धरित्या हात धुण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. स्वच्छता जनजागृती बॅनर, जागतिक हात धुवा दिन तसेच कोविड लसीकरण जनजागृती हस्तपत्रिकेचे प्रकाशन तसेच ‘बॅच’चे अनावरण यावेळी करण्यात आले.

जिल्हा परिषदेद्वारे 14 ते 22 ऑक्टोबर या कालावधीत सर्व जिल्हाभरात चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार असून या चित्ररथाचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कलापथकाच्या कलाकारांनी जनजागृतीपर कार्यक्रम सादर केला.


ही बातमी शेअर करा.