Lonavala News : पोलीस अधिकाऱ्यांच्या दडपशाहीच्या निषेधार्थ लोणावळ्यात आमदार शेळके यांचे ‘रास्ता रोको’ आंदोलन

Lonavala News : पोलीस अधिकाऱ्यांच्या दडपशाहीच्या निषेधार्थ लोणावळ्यात आमदार शेळके यांचे ‘रास्ता रोको’ आंदोलन

Pckhabar- लोणावळा-खंडाळा परिसरातील टपरीधारक, टॅक्सी,रिक्षा चालक मालक संघटना व माळी कामगार संघटनेच्या वतीने स्थानिक प्रशासन व काही पोलीस अधिकाऱ्यांच्या दडपशाहीच्या निषेधार्थ लोणावळात आज ( मंगळवार) मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यासह महाविकास आघाडीच्या वतीने ‘रास्ता रोको’ आंदोलन केले.

लोणावळा आणि परिसरातील अनेक व्यवसाय पर्यटन,पर्यटकांवर अवलंबून आहेत. सध्या कोरोनाचे सावट कमी होत असताना पर्यटनस्थळे सुरू होत आहे. ओला-उबेरच्या गाड्यांना स्थानिक टॅक्सी, रिक्षाचालक अनेक वर्षांपासून विरोध करीत आहेत. तसेच छोटे-मोठे व्यवसाय टपरीधारक, हातगाडीधारक, पर्यटन स्थळे व परिसरात व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करीत आहेत.परंतु स्थानिक प्रशासन, अधिकारी चुकीच्या पद्धतीने टपरीधारकांवर अतिक्रमणाच्या नावाखाली कारवाई करून गोरगरीब जनतेची उपासमार करीत आहेत. या टपरीधारकांना नगरपरिषदेने योग्य ठिकाणी जागा उपलब्ध करावी.

हॉकर्स झोन करावेत. अशी मागणी सर्वांची आहे. आधीच कोरोनामुळे आर्थिक संकटात असणाऱ्या नागरिकांचा गांभीर्याने विचार व्हावा.माळीकाम करणाऱ्या कामगारांना देखील न्याय मिळाला पाहिजे. स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळवून देण्यासाठी सर्वांनी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. कायदा सर्वांसाठी समान आहे. सर्वांनी कायद्याच्या अधीन राहून काम करावे.परंतु काही ठराविक मंडळींनी राजकीय द्वेष न ठेवता सर्वांना समान वागणूक द्यावी. गरीब जनतेवर अन्याय होता कामा नये,असे आवाहन आमदार सुनील शेळके यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *