IPL News 2021: चेन्नईच ‘किंग’; मराठमोळ्या ऋतुराजच्या दमदार खेळीने चेन्नई सुपर किंग्स फायनलमध्ये


IPL News 2021: चेन्नईच ‘किंग’;
मराठमोळ्या ऋतुराजच्या दमदार खेळीने
चेन्नई सुपर किंग्स फायनलमध्ये
Pckhabar- इंडियन प्रीमियर लीग 2021 मधील पहिला क्वालिफायर सामना रविवारी चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. हा सामना शेवटच्या षटकापर्यंत चालला आणि चेन्नईने ४ विकेट्सने विजय मिळवला. या विजयासोबतच चेन्नईने आयपीएल 2021 च्या अंतिम सामन्यात धडक दिली.

सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून दिल्लीला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यादरम्यान दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ५ विकेट्स गमावत १७२ धावांचा डोंगर उभा केला होता. तसेच चेन्नईला १७३ धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना चेन्नईला पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर फाफ डू प्लेसिसच्या रूपात धक्का बसला. मात्र, त्यानंतर चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड आणि रॉबिन उथप्पाने जबरदस्त कामगिरी करत धावफलक हलता ठेवला आणि आपली शतकी भागिदारीही पूर्ण केली.

मात्र, १४ व्या षटक टाकत असलेल्या टॉम करनने तिसऱ्या आणि सहाव्या चेंडूवर अनुक्रमे उथप्पा (११३ धावसंख्येवर) आणि शार्दुल ठाकूरला (११७ धावसंख्येवर) श्रेयस अय्यरकडून झेलबाद केले. यानंतर फलंदाजीस आलेल्या अंबाती रायडूही ११९ धावसंख्येवर धावबाद झाला. यानंतर फलंदाजीला मोईन अली आला. मोईनने ऋतुराजला साथ देत धावफलक हलता ठेवला. दोघेही १४९ धावांपर्यंत टिकून होते. मात्र, ऋतुराज (५० चेंडूत ७० धावा) १८.१ षटकात आवेश खानच्या गोलंदाजीवर  झेलबाद झाला. त्यानंतर टॉम करन टाकत असलेल्या १९ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मोईन अलीही कागिसो रबाडाच्या हातून झेलबाद झाला.  त्यामुळे अखेरीस चेन्नई संघ संकटात सापडला होता. चेन्नईला अखेरच्या षटकात १३ धावांची गरज होती. पण, यावेळी कर्णधार एमएस धोनीने त्याच्या  आपल्या अंदाजात फलंदाजी केली आणि तीन चौकारांसह चेन्नईला विजय मिळवून दिला. धोनी ६ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकारासह १८ धावांवर नाबाद राहिला.  चेन्नईने १९.४ षटकांत १७३ धावा पूर्ण करुन सामना जिंकला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *