Sangvi News :  ईव्हीएमवरील उमेदवारांची क्रमवारी निश्चित करा :  स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतूल शितोळे

ही बातमी शेअर करा.

Sangvi News :  ईव्हीएमवरील उमेदवारांची क्रमवारी निश्चित करा :  स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतूल शितोळे
Pckhabar-राज्यातील महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपरिषदा आणि नगरपालिकांमध्ये 2022 च्या सुरूवातीलाच निवडणूका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये उमेदवारांच्या आडनावापासून बॅलेटवर क्रम ठरविला जातो. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत नोंदणीकृत राष्ट्रीय व प्रादेशिक पक्ष, नोंदणी नसलेला प्रादेशिक पक्ष आणि अपक्ष असा क्रम ठरवावा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतूल शितोळे, अधिराज शितोळे यांनी केली आहे.

याबाबत शितोळे यांनी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका अवघ्या पाच महिन्यावर आल्या आहेत. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर या महापालिकांसह नगरपालिका, नगर पंचायती, जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत. मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये तीन सदस्यांचा प्रभाग असणार आहे. नगरपालिकेत 2, तर नगर पंचायतीमध्ये 1 प्रभाग पद्धत असणार आहे. त्यादृष्टीने प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे काम सध्यस्थितीत युध्दपातळीवर सुरू आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारांच्या आडनावापासून ईव्हीएमवर क्रम ठरविला जातो. या निवडणुकांमध्ये उमेदवारांची संख्या जास्त असते. यामध्ये राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाचा उमेदवारचा क्रम वरती येत नसून आडनावाप्रमाणे सर्वात खाली क्रम येतो. त्यामुळे मतदारांचा गोंधळ उडतो. घाईगडबडीने अन्य उमेदवाराच्या समोरील मतदारांकडून बटन दाबले जाते.

लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीतही नोंदणीकृत राष्ट्रीय व प्रादेशिक पक्ष, नोंदणी नसलेला प्रादेशिक पक्ष आणि अपक्ष असा क्रम ठरवावा. अशाच पध्दतीने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काही राज्यात ईव्हीएमवर उमेदवारांचा क्रम ठरविला जातो. त्यामुळे या मागणीचा योग्य तो विचार करून राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त उरविंदर पाल सिंग मदान यांना सूचना करावा, अशी मागणी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष शितोळे यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.


ही बातमी शेअर करा.