Maharashtra News : उजनी धरणाने ४१ वर्षात ३२ वेळा गाठली शंभरी !
Pckhabar- सोलापूरसह नगर आणि पुणे या तीन जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणाने ४१ वर्षात ३२ वेळा शंभरी गाठली आहे. धरणात ११७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. यामध्ये ५२.३२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे.धरण क्षेत्रात अपेक्षित पाऊस झाला नसला तरीसुद्धा पुणे जिल्ह्यातील इंदापूर, दौंड आणि अहमदनगर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे तसच धरणावर २६ मिलिमीटर पाऊस झाल्यामुळे धरणातील पाण्याने मंगळवारी मध्यरात्री शंभर टक्क्यांची पातळी ओलांडली. उजनी धरण भरल्यामुळे धरणावर अवलंबून असलेल्या शेतकरी आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातवरण पसरले आहे.
दरम्यान बंडगार्डन व दौंड येथून उजनी धरणात येणाऱ्या विसर्गाची तीव्रता लक्षात घेऊनच उजनीमधून भीमा नदीत पाणी सोडायचे की नाही याबाबत नियोजन केले जाणार आहे.
२०१९ सालात उजनी धरण २७ ऑगस्टला तर २०२० मध्ये ६ ऑगस्ट रोजी उजनी १०० टक्के भरले होते.मात्र २०२१ मध्ये दोन महिने उशिरा उजनी धरण १०० टक्के भरले आहे.उजनी धरणावरील १९ धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसावर उजनीचे भविष्य अवलंबून आहे.
उजनी धरण हे जायकवाडी व कोयना धरणानंतर सर्वात मोठे धरण असून मृत साठ्यात महाराष्ट्रातील हे सर्वात मोठे धरण आहे. उजनी धरणाची पाणी साठवण क्षमता ३३२० दलघमी ( १२३ टीएमसी ) तर उपयुक्त पाणी साठवण क्षमता १५१७.१९ दलघमी आणि मृत पाणी साठवण क्षमता १८०२.८१ दलघमी , उपयुक्त पाणी साठ्यापेक्षा ( ५३.५७ टीएमसी ) मृतसाठा ( ६३.६५ टीएमसी ) मोठे असलेले महाराष्ट्रातील हे उजनी धरण आहे.
उजनी धरणाचे पाणलोट क्षेत्र हे १४८५६ चौरस किलोमीटर असून या धरणाखाली २९००० हेक्टर क्षेत्र ,५१ गावे ( पुणे २५, सोलापूर २३ आणि अहमदनगर ३ )बुडालेली आहेत . उजनी धरणाच्या निर्मितीनंतर त्या पाण्याद्वारे जवळपास ३ लाख ९७ हजार ८०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. तसेच २९ हजार हेक्टरवर उभा असलेल्या या उजनी धरणातील पाण्यावर उजनी डावा कालवा ९६ हजार हेक्टर ,उजनी उजवा कालवा ५१ हजार ८०० हेक्टर तसेच भीमा सीना नदी व बोगद्यातून येणाऱ्या पाण्यावर २ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्र अवलंबून आहे. उजव्या आणि डाव्या कालव्याद्वारे १ लाख ४७ हजार ८०० हेक्टर क्षेत्र आठमाही ओलिताखाली आले आहे.
उजनी धरण १०० टक्के भरले आहे. परंतु धरणात १११ टक्क्यांपर्यंत पाणी मावते. आता ऑक्टोबर महिना असल्याने पुढे पावसाची शक्यता कमीच आहे. त्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरेपर्यंत भीमा नदीद्वारे पाणी खाली सोडण्याचा निर्णय घेतला जाणार नाही. सध्या दौण्डवरून ८ हजार ३०० तर बंडगार्डनवरून १ हजार ८०० क्युसेकचा विसर्ग येऊ लागला आहे. परंतु, त्याठिकाणाहून ५० हजार ते १ लाखांपर्यंत विसर्ग धरणात येऊ लागल्यास धरणातून भीमा नदीद्वारे पाणी सोडण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.






Leave a Reply