Pimpri News : कविता हा संवेदनशीलतेचा उत्सव : राजन लाखे

Pimpri News : कविता हा संवेदनशीलतेचा उत्सव : राजन लाखे
Pckhabar- “कविता हा संवेदनशीलतेचा उत्सव असतो!” असे भावोत्कट उद्गार महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे यांनी राष्ट्रपती पुरस्कारविजेते आदर्श शिक्षक, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुभाष चटणे लिखित आणि संवेदना प्रकाशननिर्मित ‘मृगजळ’ या कवितासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना  केले.

नियो वुड्स हॉटेल, वाल्हेकरवाडी रस्ता, चिंचवड येथे महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी उपमहापौर केशव घोळवे, शिक्षण मंडळ सदस्य गजानन चिंचवडे, ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले, राज अहेरराव, सुरेश कंक, प्रकाशक नितीन हिरवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुरुषोत्तम सदाफुले म्हणाले की, “कविता म्हणजे शब्दांची रांगोळी नसते; तर अंतरात्म्यातून आलेली आरोळी असते!” या प्रसंगी कवी सुभाष चटणे यांनी आपल्या मनोगतातून, “१९८३ सालापासून कवितालेखन करताना कवितेच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक आणि कौटुंबिक समस्यांवर भाष्य करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नांची दखल घेऊन काव्यक्षेत्रातील विविध पुरस्कार वाट्याला आलेत. साहित्याने मला जगण्याची एक नवी दिशा दिली; तसेच आज ३९ वर्षांच्या सेवापूर्ती निमित्ताने कुटुंबीय, आप्तेष्ट, साहित्यिक आणि शिक्षकपरिवार यांच्या प्रेमामुळे मनांत कृतार्थपणाची भावना आहे!” अशी कृतज्ञता व्यक्त केली.

राजन लाखे पुढे म्हणाले की, “कविता हा संवेदना, व्यथा, वेदना, जाण, जाणीव, उत्साह, चेतना, आशा यांचा संवेदनात्मक संगम असतो. लेखक, कवी, साहित्यिक या संगमातील प्रत्येक बाजू आपल्या लेखणीतून व्यक्त करीत असतो!” या सोहळ्याला सुभाष चटणे यांच्यावर आणि त्यांच्या कवितेवर प्रेम करणारे विविध क्षेत्रांतील रसिक उपस्थित होते. जालिंदर राऊत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अमोल फुंदे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *