IPL News: मुंबई इंडियन्सच्या पंजाब
किंग्जवर विजयाने आव्हान कायम
Pckhabar- आयपीएलच्या 14 (IPL 2021) व्या पर्वातील 42 वा सामना मंगळवारी रात्री अबुधाबीच्या शेख झायद मैदानात खेळवला गेला. मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जवर (MI vs PBKS) 6 विकेट्सनी विजय मिळवला.
या सामन्यात दोन्ही संघानी उत्तम खेळ दाखवला. आधी मुंबईने 135 धावांमध्ये पंजाबला रोखले. पण त्यानंतर पंजाबनेही मुंबईसारख्या तगड्या फलंदाजी असलेल्या संघाला 136 धावांचे आव्हान सहजासहजी पूर्ण करु दिले नाही.
अष्टपैलू खेळाडू हार्दीक पंड्या (Hardik Pandya) या सामन्यात पुन्हा फॉर्ममध्ये आल्याचे पाहायला मिळाले. 30 चेंडूत धमाकेदार 40 धावांची खेळी पंड्याने करत मुंबईला सामना 1 ओव्हर आणि 6 गडी राखून जिंकवून दिला.
सामन्यात आधी गोलंदाजीचा घेतलेला मुंबई संघाचा निर्णय गोलंदाजांनी बरोबर करुन दाखवला. पंजाबच्या संघाला 20 षटकात 135 धावांपर्यंतच मजल मारुन दिली. यावेळी मुंबईच्या गोलंदाजानी सर्व फलंदाजाना जेरीस आणलं. केवळ मार्करम (42) आणि हुडा (21) यांची एक उत्तम भागिदारी झाल्याने पंजाबने 135 धावांपर्यंत मजल मारली. दरम्यान मुंबईकडून पोलार्ड आणि बुमराहने प्रत्येकी दोन आणि राहुल चाहर, कृणाल पंड्याने प्रत्येकी एक विकेट घेतला.
मुंबईला 136 धावांचे आव्हान पंजाबने दिले होते. मुंबईच्या फलंदाजीतील खोली पाहून हे आव्हान त्यांच्यासाठी क्षुल्लक होते. पण पंजाबच्या गोलंदाजांनी कडवी झुंज दिली. यामध्ये युवा गोलंदाज रवी बिश्नोईने त्याच्या पहिल्याच षटकात कर्णधार रोहितसह सूर्यकुमारची विकेट घेत मोठी कामगिरी केली होती. पण त्यानंतर त्याला एकही विकेट घेता आली नाही. याशिवाय शमी आणि एलीस यांनी एक एक विकेट घेतली. सामना 19 व्या षटकापर्यंत गेला. पण त्याचवेळी शमीच्या एका षटकात पंड्याने 17 धावा ठोकत सामना मुंबईला जिंकवून दिला.










Leave a Reply