Pimpri News : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये ‘इलेक्ट्रिशियन ट्रेड’च्या प्रवेश सुरू करा : नगरसेविका स्विनल म्हेत्रे

Pimpri News : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये ‘इलेक्ट्रिशियन ट्रेड’च्या प्रवेश सुरू करा : नगरसेविका स्विनल म्हेत्रे

– महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे मागणी
Pckhabar-पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये इलेक्ट्रिशियन ट्रेडसाठीचे प्रवेश सुरू करावेत. त्यामुळे सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना नव्या संधी उपलब्ध होतील, अशी मागणी भाजपा नगरसेविका स्विनल म्हेत्रे यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, निगडीतील औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पिंपरी-चिंचवड या ठिकाणी आयटीआयच्या ५१२ जागा उपलब्ध आहेत. आयटीआयमधील प्रशिक्षण झाल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर इंजिनिअरिंगमध्ये उच्च शिक्षणाचा पर्याय खुला असतो. आयटीआय केलेले लोक नोकरीसोबतच स्वयंरोजगार करण्याचा विचारही करु शकतात. इंडस्ट्रीच्या गरजा लक्षात घेवून राज्य सरकारनेही आयटीआयमधील अभ्यासक्रमांमध्ये बदल केले आहेत. इंडस्ट्रीसोबत टायअप करुन नव्या योजना हाती घेण्यात येत असतात.

तसेच, आयटीआयचा कमी कालावधीचा अभ्यासक्रम, प्रवेशाचे शुल्क कमी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नोकरीची हमी. त्यामुळे आयटीआय अभ्यासक्रमाला सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांची पसंती असते. शासकीय संस्थेत ट्रेड मिळावा. यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चूरस असते. परंतु, कोरोनामुळे यावर्षी इलेक्ट्रिशियन ट्रेडचे प्रवेश भरती करण्यात आले नाहीत. कोरोनामुळे तीन शिफ्टमध्ये काम करण्यास परवानगी नसल्याचे कारण देत यंदा इलेक्ट्रिशियन ट्रेडचे प्रवेश बंद ठेवले आहेत.

दुसरीकडे, माध्यमिक बोर्डाच्या परिक्षेत विद्यार्थ्यांना यावर्षी चांगले गुण मिळाले आहेत. त्यामुळे गुणांचा कटऑफ देखील वाढला आहे. चांगले गुण मिळूनही इलेक्ट्रिशियनसाठी जागा उपलब्ध होत नाही. परिणामी, विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे.

महापालिका औद्योगिक प्रशिक्षण संस्थांकडे विद्यार्थ्यांचा ओघ असतो. मात्र, इलेक्ट्रिशियन ट्रेडसाठी भरतीसाठी भरती नसल्याने दुसऱ्या संस्थांचा आधार घ्यावा लागतो. याबाबत प्रशासनाने योग्य कार्यवाही करावी, असेही नगरसेविका स्विनल म्हेत्रे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *