Bhosari News: तलावात बुडून मुलाचा मृत्यू; तेरा वर्षीय मुलाने वाचविले तिघांचे प्राण

तलावात बुडून मुलाचा मृत्यू; तेरा वर्षीय मुलाने वाचविले तिघांचे प्राण
Pckhabar- तलावात पोहण्यासाठी गेलेल्या एका मुलाचा बुडून मृत्यू झाला. तर 13 वर्षीय मुलाने तीन जणांचे प्राण वाचविले. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. सद्‌गुरूनगर, भोसरी येथे सोमवारी दुपारी हा प्रकार घडला.

सूरज वर्मा (वय 12, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. संदीप डवरी (वय 12), ओमकार शेवाळे (वय 13), ऋतुराज  शेवाळे (वय 14) या मुलाचे प्राण वाचविण्यात यश आले. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. तर म्हैस चारण्यासाठी गेलेल्या आयुष गणेश तापकीर या 13 वर्षांच्या मुलाने बुडत असलेल्या तिघांना वाचविले.

भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सद्‌गुरूनगर, भोसरी येथील जुन्या कचरा डेपोजवळ असलेल्या तलावामध्ये 12 ते 15 वयोगटातील चार मुले पोहण्यासाठी गेली होती. त्यावेळी तेथील खोल खड्ड्याचा अंदाज न आल्याने ती मुले बुडू लागली. ही बाब आयुष याच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्याने तलावाच्या दिशेने धाव घेतली. संदीप, ओमकार आणि ऋतूराज या तिघांना आयुष तापकीर याने पाण्याबाहेर काढले. मात्र सूरज याचा पत्ता लागला नाही.
घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलिसांनी घटनस्थळी धाव घेतली. जखमीपैकी दोघांना “वायसीएम’ रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. अग्निशामक दलास पाचारण करून सूरज याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *