Pimpri News : स्मार्ट सिटी कंपनी म्हणायचं की स्मार्ट भाजप कंपनी ? – संजोग वाघेरे

 

Pimpri News : स्मार्ट सिटी कंपनी म्हणायचं की स्मार्ट भाजप कंपनी ? – संजोग वाघेरे

पीआरओ नियुक्तीमुळे भाजप पदाधिका-यांची वशिलेबाजी उघड

Pckhabar- स्मार्ट सिटीच्या नावाखाली पिंपरी चिंचवडमध्ये सत्ताधारी भाजप प्रशासनाला हाताशी धरून भोंगळ कारभार करीत आहे. त्याची असंख्य उदाहरणे उघड होत असतानाच स्मार्ट सिटी कंपनीच्या  जनसंपर्क अधिकारी (पीआरओ) पदावर भाजपचे सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्या खासगी स्वीय सहाय्यकाची नियुक्ती झाल्याची बाब समोर आली आहे. ही कारभारातील गोपनियता, विश्वासार्हता धोक्यात आणणारी गंभीर बाब आहे. या प्रकाराने स्मार्ट सिटीतील भाजपचा हस्तक्षेप उघड झाल्यामुळे आता स्मार्ट सिटी कंपनी म्हणावे की “पिंपरी चिंचवड स्मार्ट भाजप कंपनी”, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी उपस्थित केला आहे.

या संदर्भात संजोग वाघेरे‌ यांनी आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे सीईओ राजेश पाटील यांना पत्र देत नियुक्ती तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे.‌ त्यांनी म्हटले आहे की, महापालिकेतील सत्ताधारी भाजपचा साडेचार वर्षातील कारभार शहरवासीयांनी पाहिला. स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहराची काय दुर्दशा करून ठेवली आहे. ते खोदलेल्या रस्त्यांवरून शहरवासीय पाहत आहेत, तर स्मार्ट सिटीच्या कामांमधील भ्रष्टाचार, भाजप नेत्यांचे संबध देखील उघड झालेले आहेत. त्यानंतर स्मार्ट सिटीमध्ये वशिलेबाजी करून आपल्या बगलबच्च्यांची वर्णी लावण्याचे काम भाजपने सुरू केले आहे. स्मार्ट सिटी कंपनीसाठी जनसंपर्क अधिकारीपदावर महापालिकेतील सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्या निकटवर्तीयाची वर्णी लागल्याची बाब समजली आहे.

नामदेव ढाके भाजपचे सत्तारुढ पक्षनेते आणि ते सध्या स्मार्ट सिटी कंपनीचे संचालक देखील आहेत. त्यांच्या सोबत मागील काही वर्षे त्यांचा स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहणा-या व्यक्तीची जर स्मार्ट सिटीच्या महत्त्वाच्या पदावर वर्णी लावली जात असेल, तर स्मार्ट सिटीच्या कारभारात भाजपचा असलेला हस्तक्षेप आणि वशिलेबाजी उघड होत आहे. या संदर्भात या प्रक्रियेत सहभागी झालेल्या अनुभवी व पात्र उमेदवारांनी तक्रार केल्याची माहिती मिळाली आहे. काही अधिका-यांकडूनही या नियुक्तीत हस्तक्षेप झाल्याचे सांगितले जात आहे. महापालिकेच्या आणि स्मार्ट सिटीच्या कारभारात या प्रकारे सत्ताधारी भाजप आणि त्यांच्या पदाधिका-यांशी संबधित व्यक्ती महत्त्वाच्या पदावर काम करणार असतील, तर ही बाब गंभीर आहे.

या प्रकारामुळे स्मार्ट सिटी कंपनी प्रशासन चालवत आहे की भाजप ? हा प्रश्न निर्माण होतो. कारभारातील गोपनियता आणि विश्वासार्हता धोक्यात येते. याचा गांभीर्याने विचार करून कंपनीचे सीईओ म्हणून महापालिका आयुक्त यांनी तातडीने नियुक्ती रद्द करणे अभिप्रेत आहे. अन्यथा, स्मार्ट सिटी कंपनीत होणा-या हस्तक्षेपाला प्रशासक म्हणून आयुक्त आणि संपूर्ण यंत्रणा देखील जबाबदार आहेत. या पध्दतीने कारभार होणार असल्यास कंपनीचे नाव बदलून ते स्मार्ट भाजप कंपनी असे करण्याची आमची मागणी असल्याचे संजोग वाघेरे यांनी म्हटले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *