
Dehugaon News : घरचा गणपती सजावट स्पर्धेत गणेश सुतार व गौरी सजावट स्पर्धेत सौ. रसिका स्वप्नील काळोखे यांनी पटकावला प्रथम क्रमांक
Pckhabar-देहू पंचक्रोशीतील नागरिकांच्या कल्पनाशक्तीला संधी मिळावी व तिचे सुंदर अशा कला सजावटीमध्ये रूपांतर व्हावे व त्यातून घराघरांमध्ये श्री गणराया बद्दलची भक्ती वृद्धिंगत व्हावी या भावनेने श्रीक्षेत्र देहूच्या सांस्कृतिक, सामाजिक, अध्यात्मिक, कला अशा विविध क्षेत्रात कार्यरत असणारे अभिजीत कंद यांनी आपल्या मित्र परिवाराच्या सहकार्याने श्रीक्षेत्र देहू पंचक्रोशीसाठी ‘घरचा गणपती व गौरी सजावट’ स्पर्धेचे आयोजन केले होते.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ एकादशीचे औचित्य साधत शुक्रवारी मावळचे खासदार महासंसदरत्न श्रीरंग आप्पा बारणे, जिल्हा परिषद सदस्या शैलाताई खंडागळे, युवासेना अध्यक्ष अनिकेत घुले व झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध अशा देवमाणूस या मालिकेतील अभिनेत्री डिंपल म्हणजेच अस्मिताताई देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. या बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देहू पंचक्रोशीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच अभंग प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या स्पर्धेला देहू पंचक्रोशीतून भरघोस असा प्रतिसाद लाभला.
एकूण 300 पेक्षा जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेसाठी आपला सहभाग नोंदविला होता.
पारंपरिक रचना, कल्पकता, आकर्षक मांडणी, प्रकाशयोजना, भक्तिभाव, पर्यावरणपूरक संदेश अशा विविध निकषांच्या आधारे स्पर्धकांच्या घरोघरी जाऊन दीक्षित सर, माने सर, शैलेश चव्हाण, सुरेखाताई व शिवराज हगवणे यांनी या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले.
उपसरपंच स्वप्निल आप्पा काळोखे आणि त्यांच्या पत्नी श्री महालक्ष्मी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रसिका स्वप्निल काळोखे यांनी गौरी सजावटीत महिलांनी कोविड काळात दिलेले ‘योगदान आणि केलेली सेवा या उद्देशाने त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी डॉक्टर व पोलीस वैशातील गौरी, त्याचबरोबर गोवंश वाचवा, पेटा हटवा अर्थात बैलगाडा शर्यत सुरु करण्यासाठी असलेली शेतकरी बांधवांची तळमळ….अशी आकर्षक सजावट केली होती. या देखाव्याची देहूगाव परिसरात मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. त्यामुळेच गौरी सजावट स्पर्धेमध्ये सौ. रसिका काळोखे यांच्या सजावटीला प्रथम क्रमांक मिळाला आहे.
द्वितीय क्रमांक सौ. निकिता पंढरीनाथ मोरे आणि सौ. पुनम अमित घेनंद यांना विभागून देण्यात आला.
तसेच तृतीय क्रमांक सौ. केसरी निखिल काळोखे यांनी मिळविला. गणपती सजावट स्पर्धेमध्ये जगद्गुरु तुकोबारायांच्या मंदिराचे महाद्वार हुबेहूब देखाव्यातून आकर्षकपणे साकार करणाऱ्या माळीनगर येथील श्री गणेश पुरुषोत्तम सुतार यांनी पटकावला.
द्वितीय क्रमांक कुमार ओम महेश वाळके यांनी तर तृतीय क्रमांक श्री नवनाथ भसे आणि अमोल भसे यांनी मिळविला. गौरी सजावट स्पर्धेसाठी सौ. श्रीजा रोहित काळोखे, सौ. रंजना अशोक काळोखे, सौ. नेवासकर, सौ. विद्या घाडगे, सौ. बरोकर यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. गणपती सजावट स्पर्धेसाठी कुमार देवांत सुमित काळोखे, कुमार अक्षय गाडे, कुमार विशांत पिंजण, कुमार अभिषेक शिंदे, कुमार आदित्य निकम व कुमार श्रीपाद पाठक यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.
गौरी सजावट स्पर्धेतील प्रथम क्रमांकास पैठणी,द्वितीय क्रमांकास एक ग्रॅम सोन्याची नथ आणि तृतीय क्रमांकास एक ग्राम सोन्याच्या बांगड्या देण्यात आल्या. तसेच गणपती सजावट स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकास एलईडी टीव्ही, द्वितीय क्रमांकास स्पोर्ट्स सायकल व तृतीय क्रमांकास स्पोर्ट्स किट देण्यात आले. तसेच सर्व विजेत्यांना व उत्तेजनार्थाना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी अभिनंदन केले व लवकरात लवकर हे कोरोनाचे संकट विघ्नहर्त्या गणरायाने दूर करावे व उत्सवप्रिय वातावरण निर्माण व्हावे, अशी सदिच्छा या बक्षीस वितरण समारंभाच्या निमित्ताने व्यक्त केली.
बक्षीस वितरण कार्यक्रमाचे प्रास्ताविक देहू शिवसेनाप्रमुख सुनील हगवणे व सूत्रसंचालन प्रा. विकास कंद यांनी केले.











Leave a Reply