Dehugaon News :  देहूतील गायरानची जमीन पोलीस आयुक्तालयासाठी देऊ नये

Dehugaon News :  देहूतील गायरानाची जमीन पोलीस आयुक्तालयासाठी देऊ नये

देहूगाव राष्ट्रवादीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी

अजितदादांनी दिले ‘हे’ आश्वासन

Pckhabar- देहूगाव हे श्री संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी असून महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रापैकी प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. त्यामुळे दरीवर्षी देहूत लाखो भाविक येत असतात. देहूगाव परिसरात नागरीकरणही झपाट्याने विकसित होत आहे. या नागरिकांसाठी प्रशस्त क्रिडांगण, शासकीय रूग्णालय, कचरा डेपो, मल निस्सारण प्रकल्प आदी सुविधा होणे गरजेचे आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला देहूतील गायरानची जमीन देऊ नये, अशी मागणी देहूगाव राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी केली आहे.

देहूगाव राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रकाश हगवणे यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने आज (शुक्रवार) उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेत निवेदन दिले. याप्रसंगी हगवणे यांच्यासह कामगार सेलचे उपाध्यक्ष योगेश जाधव, राष्ट्रवादी कॉग्रेसचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड. सुरेश खुर्पे, सरचिटणीस सुनिल कडुसकर, विशाल भैय्या परदेशी, शैलेश चव्हाण,  माणिक जाधव, योगेश परंडवाल, योगेश मोरे, प्रशांत, बेंडभर, मनोज परंडवाल आदी पदाधिकारी उपस्थित होते.

देहूगाव येथील गट नंबर 97 मध्ये 59 हेक्टर व 39 आर एवढी गायरान जमीन ग्रामपंचायतीकडे देखभालीसाठी होती. तशी फेरफारवर नोंद देखील आहे. मात्र, देहुगाव ग्रामपंचायत असताना 21 ऑगस्ट 2018 रोजीच्या ग्रामसभेच्या ठराव क्रमांक 9/1 या ठरावानुसार 15 एकर जागा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी देण्याबाबत ठराव केला होता. मात्र, पन्नास एकर जागेची मागणी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शासनाकडे केली आहे. या जागेची नुकतीच पाहणी करण्यात आली.

याबाबत प्रकाश हगवणे म्हणाले की, ’’देहूगावचे वाढते नागरीकरण पाहता गायरानची जमीन येथील नागरिकांसाठीच ठेवण्याची गरज आहे. देहू परिसरात दिवसेंदिवस लोकसंख्या वेताने वाढत आहे. त्यामुळेच देहूगाव ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाले आहे. येथील नागरिकांसाठी क्रिडांगण अथवा उद्यान, चांगले सुसज्जय शासकीय रूग्णालय होणे गरजेचे आहे. तसेच कचरा डेपो आणि मल निस्सारण प्रकल्पही महत्वाचा आहे. त्यामुळे देहू नगरपंचायतीकडे असलेल्या गायरानची जमीन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी देऊ नये, अशी आमच्यासह देहूकरांची भावना आहे. त्यामुळे जमीन देण्याबाबत फेरविचार करावा, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली आहे. दादांनीही लोकभावनेची दखल घेऊन देहूकरांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिल्याचे हगवणे यांनी सांगितले.’’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *