Wakad News: व्यावसायिकाला 10 वर्ष जेलमध्ये पाठविण्याची धमकी देत 25 लाखांच्या खंडणीची मागणी

Wakad News: व्यावसायिकाला 10 वर्ष जेलमध्ये पाठविण्याची धमकी देत 25 लाखांच्या खंडणीची मागणी

7 जण गजाआड

Pckhabar- मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेचे पदाधिकारी असल्याचे सांगून एका व्यावसायिकाला दहा वर्षे जेलमध्ये पाठविण्याची धमकी देत 25 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. याप्रकरणी वाकड पोलिसांनी सात जणांना बेड्या ठोकल्या आहेत. हा प्रकार दहा सप्टेंबर रोजी रात्री रामनगर, रहाटणी येथे बालाजी ट्रेडर्स या दुकानात घडला.

हेमंत निवगुणे, कपिल राक्षे, आदित्य जेधे, तानाजी मस्तूद, किरण घोलप, सतीश केदारी, ज्योत्स्ना पाटील अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सुरजाराम रूपाराम चौधरी (वय 37, रा. तळेगाव दाभाडे. मूळ रा. राजस्थान) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे रहाटणी येथे बालाजी ट्रेडर्स नावाचे किराणा दुकान आहे. हे दुकान फिर्यादी यांचे भाऊ सांभाळतात. आरोपींनी मानवाधिकार व भ्रष्टाचार निर्मूलन नावाची संघटना सुरू केली असल्याचे आरोपी सांगतात.

10 सप्टेंबर रोजी रात्री सात वाजताच्या सुमारास आरोपी फिर्यादी यांच्या दुकानात आले. फिर्यादी यांच्या दुकानात येऊन तुम्ही बनावट साहित्य विकता. त्यामुळे फिर्यादी व त्यांच्या भावाला दहा वर्षांसाठी जेलमध्ये पाठवण्याची आरोपींनी धमकी देत 25 लाखांच्या खंडणीची मागणी केली. आरोपींनी धमकावून फिर्यादी यांच्या भावाच्या खिशात असलेले आठ हजार पाचशे रुपये आरोपींना देण्यास भाग पाडले. सहाय्यक पोलीस निरीक्षक लोहार तपास करीत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *