
Article By Dr. Ankush jadhav : ‘मधमाधुर्य – मधाचे महत्त्व’
Pckhabar- फार प्राचीन काळापासून ज्या पाच पदार्थांचा, द्रव्यांचा “अमृत” म्हणून उल्लेख केला जातो. त्यात मधाचा समावेश आहे. मध अमृतासमान गुणकारी व उपयोगी आहे. धार्मिक, सामाजिक व वैद्यक शास्त्रात या सर्वच शास्त्रांत मधाला अत्यंत महत्व आहे. प्रख्यात वैद्य वाग्भटाचार्य यांनी मधाला”मध हे एक अद्वितीय औषध आहे”असे म्हंटले आहे. मधाचे महत्व जगभर आहे. विशेषतः कोरोना काळात याला अधिक महत्त्व आले आहे.
भारतातून २०१३-१४ मध्ये २८हजार ३७८.४२ मेट्रिक टन मधाची निर्यात झाली होती. तर२०२०-२१ मध्ये ५९हजार ९८५ मेट्रिक टन मधाची निर्यात झाली. त्यातून भारताला ७१६ कोटी रुपये मिळाले. भारतात २०१३-१४ मध्ये मधाचे उत्पादन ७६ हजार १५० मेट्रिक टन होते ते २०१९-२० मध्ये १लाख२० हजार मेट्रिक टन झाले. साधारणतः भारतातून ५०देशांत मधाची निर्यात होते. त्यात प्रामुख्याने सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, बांगला देश, युरोपधील अनेक देश व अमेरिका. अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर भारतीय मध निर्यात होतो. मधाला संस्कृत मध्ये अनेक पर्यायी नांवे आहेत. त्यातून मधाची उत्पत्ती, गुणधर्म स्पष्ट होतात.
१)मधु-गोड पदार्थ.
२)पुष्परस-फुलांच्या रसापासून तयार झालेला पदार्थ.
३)माक्षिक-मधमाशांनी बनविलेला पदार्थ.
४)पवित्र-धार्मिक कार्यात वापरला जाणारा व शरीराला उपयोगी पवित्र पदार्थ.
मधमाशा ज्या फुलांपासून मध तयार करतात त्या फुलांचे/वनस्पती चे गुण त्या मधात येतात. ओवा,कमल,गुलाब इ.अशा साधारणतः ४५ ते ५० वनस्पतींपासून मधमाशा मध तयार करतात. सध्या बाजारपेठेत १० ते१५ प्रकारचे मध मिळतात. मस्टर्ड हनी, सूर्यफूल, हर्बल हनी, मल्टि फ्लोरा हनी इ. सर्वच बाजारपेठेत मल्टिफ्लोरा हनी ला जास्त मागणी आहे.
सध्या मधमाशी शास्त्र व मधमाशी पालन याला खूप महत्व आहे आहे. अनेक ठिकाणी मधमाशी पालन करून मध निर्मिती केली जाते. सामान्यतः मधात खालील घटक असतात. १००ग्रॅम मधात–
आद्रता-२०.२%, प्रथिने- ०.३%, खनिजे-०.२%, पिष्टमय पदार्थ-७९.५%, कॅल्शियम-५ मि. ग्रा., फॉस्फरस-१६मि. ग्रा., लोह-०.९मि.ग्रा., “क”जीवनसत्त्व-४ मि. ग्रा., कॅलोरी-३१९, मधाचा रस मधुर व अनुरस तुरट असून याचा शरीरावर होणारा परिणाम अर्थात वीर्य शीत आहे.
मध हा डोळ्यांना हितकर,
अग्निवर्धक (भूक वाढविणारा), आवाज चांगला करणारा, मऊपणा निर्माण करणारा, जखमांची शुद्धी करून ती भरून आणणारा, स्रोतसांची शुद्धी करणारा, सूक्ष्मातिसूक्ष्म भागात जाऊन कार्य करणारा, आनंद कारक, उत्साह वाढविणारा, बुद्धिवर्धक, वीर्यवर्धक, त्वचेचे सौंदर्य व रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारा आहे.
मधाचा उपयोग घसा बसणे, दात दुखणे, श्वास, खोकला, उलट्या होणे, जुलाब होणे, प्रमेह, जखमा, वारंवार तहान लागणे, झोप न येणे, हृदय विकार, क्षयरोग, शरीर जाड होणे (मेदोरोग),
गंडमाला बद्धकोष्ठता, ताप,
वातरक्त, त्वचा रोग, रक्ताल्पता,
गर्भाशय शुद्धी, मूळव्याध, स्तंभन कमी होणे, भाजणे इ.अशा अनेक रोगांत /आजारांत होतो. मधाचा उपयोग अनेक औषधांमध्ये औषध म्हणून व संरक्षण (preservative) म्हणून करण्यात आला आहे. उदा.असव व अरिष्ट इ. मध एक उत्कृष्ट अनुपान आहे. अनुपान म्हणजे सहाय्यक द्रव्य. याचा रोगनाशनासाठी अत्यंत लाभ होतो. मध काही काळ साठवून ठेवला तर काही दिवसांनी मधातील साखरेचे स्फटिक (Crystals) तयार होतात.
पोदार मेडिकल कॉलेज
(आयुर्वेदिक), मुंबई चे अधिष्ठाता कै. मो.य.लेले सर असतांना त्यांनी मधाचे प्रयोग करण्याचे ठरविले. रुग्ण आला की, त्याला कोणतेही औषध न देता फक्त मध देण्यात असे. तहान लागली, भूक लागली की दे मध. ऐका दिवसांत ५००मि. लि. ते १ लिटर मध देण्यांत येत असे.काही वेळा याला कंटाळून रुग्ण जात असत.परंतु एक सत्य आहे. बऱ्याच रुग्णांमध्ये चांगला लाभ झालेला दिसून आहे. त्यांच्या बऱ्याच तक्रारी दूर झाल्या.
सामान्यतः मध कसा व कशाबरोबर खाऊ नये.
१)मध शक्यतो गरम करून व गरम पदार्थांत मिसळून खाऊ नये.
२)मध व तूप सम प्रमाणांत एकत्र खाऊ नये.
३) मध मासे, मांस, गूळ, चरबी,बर्फ
इ.पदार्थाबरोबर खाऊ नये.
मध खा व आपले आरोग्य वाढवा.
(अवश्य वाचा-महाऔषधी मध, ले.डॉ.अंकुश जाधव, मनोविकास प्रकाशन पुणे)
डॉ.अंकुश जाधव
नवी मुंबई, इस्लामपूर (सांगली)










Leave a Reply