Pimpri News : लाचखोरी प्रकरणामुळे महापालिकेच्या लौकिकाला धक्का; स्थायी समिती सभापतींचा राजीनामा घ्या

Pimpri News : लाचखोरी प्रकरणामुळे महापालिकेच्या लौकिकाला धक्का; स्थायी समिती सभापतींचा राजीनामा घ्या
Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती कार्यालयावर 19 ऑगस्ट रोजी छापा पडला. यामध्ये समितीचे सभापती आणि चार कर्मचाऱ्यांना अटक झाली. या लाचखोरीच्या प्रकरणामुळे महापालिकेच्या लौकिकाला धक्का पोहोचला आहे. या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून स्थायी समितीचे सभापती यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी महापौर माई ढोरे यांच्याकडे केली आहे.

वाकडकर यांनी महापौरांना आज (बुधवार) निवेदन दिले आहे.  यावेळी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, उपाध्यक्ष संतोष वाघेरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड मनपाचा जागतिक पातळीवर नावलौकिक आहे. यामध्ये शहरातील सर्व घटकांचे योगदान आहे. परंतु मनपामध्ये जेव्हापासून भाजपाची सत्ता आली आहे. तेव्हापासून पिंपरी चिंचवड मनपाचे नाव चांगल्या क्षेत्रात येण्याऐवजी भ्रष्टाचारातच गाजत आहे. या भ्रष्टाचारी पदाधिका-यांचे आपण राजीनामे घ्यावेत अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आम्ही आपणाकडे करीत आहोत.

आपण या महानगरपालिकेच्या ज्येष्ठ सभासद आहात. आपल्याकडे शहरातील सुजाण नागरीक आदराने पाहत आहेत. आपण अशा भ्रष्टाचा-यांना पाठीशी घालणार नाही असा आम्हाला विश्वास आहे.भ्रष्टाचारी स्थायी समितीचा राजीनामा घेऊन आपण आपल्या नावलौकिकास जागून सर्वापुढे एक आदर्श  घालून द्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *