Talegan Dabhade News : काम करा अन्यथा राजीनामे द्या

Talegan Dabhade News : काम करा अन्यथा राजीनामे द्या

आमदार सुनिल शेळके यांची सत्ताधारी भाजप नगरसेवकांकडे मागणी
Pckhabar-  तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या सत्ताधारी भाजपच्या पदाधिकारी आणि नगरसेवकांनी येत्या आठ दिवसांत शहरातील प्रलंबित विकासकामांना सुरूवात करावी, अन्यथा पदांचे राजीनामे द्यावेत, अशी मागणी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.
नगरपरिषदेत सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी फक्त आणि फक्त भ्रष्टाचार करण्यात गुंतले असल्याचा आरोपही शेळके यांनी केला.

तळेगाव येथे झालेल्या या पत्रकार परिषदेला मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे,  संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे, तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष, विरोधी पक्षनेते  गणेश काकडे आदी उपस्थित होते.

आमदार शेळके पुढे म्हणाले”  मी आणलेल्या शासनाच्या निधीतून कामे नकोत म्हणून नागरिकांना सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी वेठीस धरत आहेत.  मुख्याधिकारी नसल्याचे कारण न देता शासनाचा निधी उपलब्ध असलेली विकासकामे आठ दिवसांत सुरू करावीत अन्यथा आपल्या पदांचे राजीनामे द्यावेत, अशी मागणी शेळके यांनी केली”.

तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष, विरोधी पक्षनेते  गणेश काकडे म्हणाले” शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेला पूर्णपणे सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी जबाबदार आहेत. यांच्या गलथान कारभारामुळे विविध विकास कामे प्रलंबित आहेत. नगराध्यक्ष मनमानी कारभार करीत असून त्याला उपनगराध्यक्षांसह सत्तारूढ पक्षाच्या नगरसेवकांचाही विरोध असल्याचे काकडे म्हणाले”.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *