Sangvi News: मराठवाडा जनविकास संघातर्फे लावलेल्या झाडांची जोमदार वाढ
वृक्षमित्र अरुण पवार यांच्या माध्यमातून केलेले संगोपन ठरले उपयुक्त
Pckhabar- पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत बीड जिल्ह्यातील घाटसावरगांव परिसर, तसेच धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने 3 वर्षापूर्वी वृक्षारोपण करण्यात आले होते. संघाचे संस्थापक अध्यक्ष व पर्यावरण प्रेमी वृक्षमित्र अरूण पवार यांच्या नियोजनातून लागवड करण्यात आलेल्या या रोपट्यांची योग्य ती देखभाल व संगोपन करण्यात आले आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत टँकरद्वारे पाणीपुरवठा करून या झाडांचे जतन केले. सध्या या झाडांची चांगल्या प्रकारे वाढ झाली असल्याने ३ वर्षांपासून घेतलेल्या कष्टाचे चीज झाल्याचे समाधान अरुण पवार यांनी व्यक्त केले.
दरम्यान, अनेक ठिकाणी विविध राजकीय पक्षाचे नेते तसेच अन्य संस्था वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करत असतात. मात्र, त्यांच्याकडून लावलेल्या झाडांचे जतन करण्याची जबाबदारी पार पाडली जात नाही. त्यामुळे असे कार्यक्रम केवळ प्रसिद्धीच्या उद्देशाने करण्यात आल्याचे नागरिकांच्या नजरेस पडते. मराठवाडा संघातर्फे गेल्या अनेक वर्षांपासून पुणे, पिंपरी -चिंचवडसह इतर जिल्ह्यात वृक्षलागवड करून लावलेल्या झाडांभोवती संरक्षक जाळी लावून, तसेच झाडे मोठी होईपर्यंत टँकरद्वारे नियमित पाणी पुरवठा करण्यात आला आहे.
देहू नजीकच्या भंडारा डोंगरावर लावलेली झाडेही अगदी 8 ते 10 फुटांपर्यंत वाढलेली आहेत. या झाडांभोवतीचे गवत काढणे असो, की पाणी घालणे असो, मराठवाडा जनविकास संघाचे पदाधिकारी, सदस्य अगदी स्वखुशीने करतात. मुळात ही झाडेच सहा फूट उंचीची लागवड केली जातात, तीही संरक्षक जाळीसह. केवळ झाडे लावून काम संपले असे नाही, तर त्यांचे संगोपन करून ती जतन करण्यासाठी स्वतः अरुण पवार झटत असतात.
“संघाचे सभासद व मित्र परिवाराच्या सहकार्याने वृक्षारोपण केलेल्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये टँकरद्वारे पाणी देण्यात आले होते . आज ही झाडे जोमाने वाढून आनंदाने डोलत आहेत. झाडे लावा, झाडे जगवा या उक्तीप्रमाणे वृक्षसेवा घडत आहे. झाडे लावा पण जगविण्यासाठी या हेतूने केवळ वृक्षारोपण करून न थांबता लावलेली झाडे जतन करण्यासाठी प्रयत्न केले जातात”. – अरुण पवार, वृक्ष मित्र










Leave a Reply