Sangvi News : सांगवीतील नदी पात्रालगतच्या स्वागत कमानीच्या कामाला स्थगिती द्या
स्थायी समितीचे माजी सभापती अतूल शितोळे यांची मागणी
Pckhabar-आगामी महापालिका निवडणुक डोळ्यासमोर ठेवून सांगवीतील भाजपचे नगरसेवक दिखावपणा करण्यासाठी घाई-घाईने पुलाजवळ आणि मुळा नदी पात्रालगतच स्वागत कमान उभारण्याचे काम करून घेत आहेत. मात्र, पुलावर असणारा वाहतुकीचा ताण, अपघातांचे प्रमाण व पुलाची रुंदी व इतर तांत्रिक बाबी तपासता ही जागा स्वागत कमानीस योग्य नाही. त्यामुळे या कमानीच्या कामाला स्थगिती देण्याची मागणी स्थायी समितीचे माजी सभापती अतूल शितोळे यांनी केली आहे.
याबाबत शितोळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे.
शितोळे यांनी निवेदनात म्हटले आहे की, सागंवीतील सर्हे नं 13 मधुन पुण्याकडे जाणार्या मार्गावर मुळा नदीवर पुल आहे. सदर पुल हा पुणे मनपा व पिं. वि. मनपा यांच्या हद्दीला जोडण्याचे काम करतो. सदर पुलाची रुंदी हि 12 मीटर आहे. व तीन (3) मीटर यात फुटपाथ आहे. सदर पुलावर वाहतुकीचा प्रचंड ताण आहे. हा पुल सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव व पिंपरी चिंचवड येथील लोकांसाठी पुण्यात जाण्या-येण्यास एक महत्त्वाचा मार्ग आहे. पुलावर सांगवीच्या सुरवातीच्या बाजूस महानगरपालिकेतर्फे सांगवी प्रवेश हद्दीवर कायमस्वरूपी स्वागत कमान करण्याचे काम सुरु झाले आहे. या कामासाठी पुल सुरु होताना सांगवी बाजूने दोन्ही बाजूस फुटपाथवर मोठे खड्डे खोदण्यात आले आहेत. हे खड्डे बहुदा स्वागत कमानीचे मुख्य खांब यासाठी असावेत. खांब हे जर दोन्ही बाजूकडील पदपथ पूर्ण व्यापून टाकणार असतील तर पादचारी चालण्यासाठी याठिकाणी पुलावरील अरुंद रस्त्याचा वापर करतील.
परिणामतः या ठिकाणी भविष्यात मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुलावर असणारा वाहतुकीचा ताण, अपघातांचे प्रमाण व पुलाची रुंदी व इतर तांत्रिक बाबी तपासता ही जागा स्वागत कमानीस योग्य नाही.
स्वागत कमान उभारण्यासाठी विरोध नाही. सांगवीमध्ये प्रवेश करण्यासाठी अन्य दोन मार्ग आहेत. त्या ठिकाणी अभ्यासपूर्ण नियोजन करून स्वागत कमान करावी. अशी मागणी शितोळे यांनी केली आहे.










Leave a Reply