Shravan Special : जाणून घेऊया  तीन ज्योतिर्लिंगांचं  महत्त्व आणि त्यांची महती!

Shravan Special : जाणून घेऊया  तीन ज्योतिर्लिंगांचं  महत्त्व आणि त्यांची महती!

Pckhabar- महादेवांच्या भारतातील प्रमुख 12 मंदिरांना 12 ज्योतिर्लिंगे म्हणतात. या 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात 5 ज्योतिर्लिंगे आहेत. आपण 12 ज्योतिर्लिंगांपैकी आपण नऊ
ज्योतिर्लिंगांची माहिती जाणून घेतली होती. आज श्रावणातील चौथ्या सोमवारनिमित्त शेवटच्या तीन ज्योतिर्लिंगांची माहिती घेऊ.

10. त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र – त्र्यंबकेश्वर)–  

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग हे भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग आहे. या ज्योतिर्लिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे शिवलिंगास ब्रम्हा, विष्णू, महेश या तिघांच्या प्रतिमा आहेत. त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी या पर्वताच्या पायथ्याशी वसले आहे. हा पर्वत म्हणजे शिवाचे एक रूप मानले जाते. याच पर्वतावर पवित्र गोदावरी नदी उगम पावते. या मंदिराचे बांधकाम इ. स. १७५५ साली पेशवे बाळाजी बाजीरावांनी केल्याचा उल्लेख आढळतो. दर १२ वर्षांनी नाशिकबरोबर त्र्यंबकेश्वरलाही कुंभमेळा भरतो. नाशिकपासून फक्त २८ कि. मी. अंतरावर त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र आहे.

11.केदारनाथ (उत्तरांचल – केदारनाथ) –

हे हिमालयात उत्तराखंडच्यारुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये मंदाकिनी नदीच्या किनारी आहे. पुराणाप्रमाणे भगवान विष्णू जगाच्या कल्याणाकरिता पृथ्वीवर निवास करण्यासाठी आले. त्यांनी बद्रीनाथ मध्ये आपले पहिले पाउल ठेवले. हे अगोदर भगवान शिवाचे स्थान होते. परंतु भगवान विष्णू साठी त्यांनी या स्थानाचा त्याग केला आणि केदारनाथ मध्ये वास्तव्य केले. या ठिकाणी शंकराचार्यांनी वयाच्या ३२ व्या वर्षी समाधी घेतली. केदारनाथ हे ज्योतिर्लिंगा बरोबरच चार धामा पैकी एक धाम आहे. प्रतिकूल हवामानामुळे हे मंदिर एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीतच दर्शनासाठी खुले असते.

12. घृष्णेश्वर (महाराष्ट्र -संभाजीनगर)-  

बारा ज्योतिर्लिंगांपैकी घृष्णेश्र्वराचे एक महत्त्वपूर्ण ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे. शिवशंकराच्या उपासकांसाठी पवित्रस्थान असलेल्या घृष्णेश्र्वर मंदिरात शिवभक्तांची खूप मोठी गर्दी होत असते. पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकरांनी इ.स. १७६५ ते १७९५ दरम्यान घृष्णेश्र्वराचे संपुर्ण मंदिर बांधून त्यावर नक्षीकाम करून घेतले. घृष्णेश्र्वराचे मंदिर संभाजीनगर जिल्ह्यात असून वेरूळपासून अगदी जवळ आहे. या मंदिरापासून जवळच श्रीगणेशाचे २१ आद्यपीठापैकी एक लक्षविनायक मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे यांच्या घराचे अवशेष (जुना वाडा) देखील मंदिराजवळ आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *