Chinchwad News : ह्दयातून येते ती कविता असते: लेखिका डॉ. प्रतिमा इंगोले
Pckhabar- कविता एक विचार आहे, ज्याची ताकद अनुभवावी लागते. कवीच्या मनात अनेक संवेदनशील विचार घोळत असतात जे गद्य अथवा पद्य अशा कवितेच्या रुपात बाहेर पडत असतात. परंतु जी ह्दयातून येते ती कविता असते असे प्रतिपादन ज्येष्ठ कवयित्री आणि लेखिका डॉ. प्रतिमा इंगोले यांनी कविसंमेलनाच्या अध्यक्ष पदावरुन मार्गदर्शन करताना केले.
निमित्त होते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी तर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती प्रित्यर्थ महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड , मातंग साहित्य परिषद व निवारा बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय मराठी कविसंमेलनाचे. आधार शोधताना आधार होत गेले, जो भेटला तसा मी आकार होत गेले, ही कविता आहे मुंबईच्या शिल्पा परुळेकर पै यांची तर लोकशाहीत काहीही घडते, वाळुला दगड म्हंटले जाते , विहिरीला समुद्र केले जाते, ही कविता आहे गोवा येथील कवी रमेश वंसकर यांची. अशा एकाहून एक आशयपुर्ण कविता भारतातील महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, कर्नाटक येथील राज्यातून आलेल्या कविंनी सादर करुन उत्तरोतर कार्यक्रम रंगवत नेला आणि रसिकांना खिळवून ठेवले.
यावेळी व्यासपिठावर प्रमुख पाहुणे म्हणून भटक्या विमुक्त जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते, विवेक मासिकचे सह कार्यकारी संपादक रविंद्र गोळे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य प्रदीप दाते उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे, कार्याध्यक्षा विनीता ऐनापुरे, मातंग साहित्य परिषदचे अध्यक्ष डॉ. धनंजय भिसे, निवारा बहुउद्देशीय सामाजिक संस्थाचे अध्यक्ष महेन्द्रकुमार गायकवाड हजर होते.
दादा इदाते म्हणाले ज्यांच्या जयंती निमित्त हे कविसंमेलन घेतले आहे ते लोकशाहिर अण्णा भाऊ साठे हे स्वत: कवी होते, शाहिर होते, ज्यांच्या साहित्यातील लेखनाची दखल तात्कालिन काळात घेतली गेली नाही जे आजच्याही काळात वास्तवतेचा अनुभव देते. रविंद्र गोळे आणि प्रदीप दाते, डॉ भिसे, महेन्द्र्कुमार गायकवाड यांनीही यावेळी मनोगते व्यक्त केली.
कविसंमेलनात महाराष्ट्र तसेच इतर राज्यातून शोभा तेलंग इंदौर (म.प्र.), डॉ. अविनाश सांगोलेकर, रमझान मुल्ला, रमेश वंसकर, अरुंधती वैद्य, प्रसाद देशपांडे बडोदा, जोत्स्ना चांदगुडे, राजेंद्र अत्रे, डॉ. अशोक शिंदे (फलटण), हनुमंत चांदगुडे, नूतन शेटे , संजय जगताप, संगीता झिन्झुरके, शिल्पा परुळेकर आदि प्रतिभावंत कवी सहभागी झाले होते. राजन लाखे यांनी प्रास्ताविक केले तर नूतन शेटे यांनी सुत्रसंचालन केले.










Leave a Reply