Pimpri News: ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारीपदी डॉ. शिवाजी ढगे यांना पदोन्नती
Pckhabar- कोरोनाच्या पहिल्या आणि दुसरा लाटेत उत्कृष्ट काम करणारे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी ढगे यांना सेवा ज्येष्ठतेनुसार ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारीपदी पदोन्नती देण्यात आली आहे. तसेच डॉ. रविंद्र मंडपे, डॉ. नासेर अलवी यांनाही पदोन्नती दिली आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी काढले आहेत.
ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारीपदाची रिक्त पदे पदोन्नतीने भरण्याकरिता महापालिका पदोन्नती समितीची 31 मे 2021 रोजी बैठक झाली. महापालिका प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने व विभागाची आवश्यकता विचारात घेता ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी पदे रिक्त ठेवणे योग्य नाही. त्यासाठी पदोन्नती समितीने पदोन्नतीपूर्व वैद्यकीय अधिकारी पदावरील अधिका-यांची शैक्षणिक अर्हता, अनुभव कालावधी, आरक्षण, सेवाज्येष्ठता, गोपनीय अहवाल, संगणक अर्हता, मत्ता व दायित्व आणि शिस्तभंग विषयक कारवाई, सेवाविषयक तपशील पडताळून डॉ. शिवाजी ढगे, डॉ. रविंद्र मंडपे आणि डॉ. नासेर अलवी यांना ज्येष्ठतेनुसार ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारीपदी पदोन्नती देण्यात आली.
वैद्यकीय मुख्य कार्यालयात त्यांची पदस्थापना आहे. वैद्यकीय विभागप्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सविस्तर कामकाज आदेश निर्गत करावेत, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुस-या लाटेत महापालिकेचे भोसरीतील नवीन रुग्णालय रुग्णांसाठी मोठे वरदान ठरले आहे. कोरोनाच्या दोन्ही लाटेत डॉ. शिवाजी ढगे यांनी जिवाची परवा न करता कोरोना रुग्णांवर यशस्वी उपचार केले. कोरोना काळात उत्कृष्ट कार्य केल्यानिमित्त त्यांच्या महापौर माई ढोरे यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला होता.










Leave a Reply