Pimpri Crime News : 1 कोटी 94 लाखांची फसवणूक, बिल्डरच्या कार्यालयाबाहेर ठेकेदाराची आत्महत्या

Pimpri Crime News : 1 कोटी 94 लाखांची फसवणूक, बिल्डरच्या कार्यालयाबाहेर ठेकेदाराची आत्महत्या

दोघे गजाआड
Pckhabar- काम करूनही बिल्डरने पैसे न दिल्यामुळे एका ठेकेदाराने
चिठ्ठी लिहून विषारी औषध प्राशन केले. ठेकेदाराचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना चिंचवड येथील पाटील प्लाझा येथे बिल्डरच्या कार्यालयाबाहेर घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

प्रविण पंडित पाटील (वय-49, रा. कोथरूड) असे आत्महत्या केलेल्या ठेकेदाराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मेहूणा विनोद भाऊराव पाटील (वय-48, रा. जळगाव) यांनी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार राजेश जगदीशप्रसाद अगरवाल, संतोष रामअवतार अगरवाल, अजित सुभाष गायकवाड, अभिजीत गायकवाड, सचिन किल्लेदार, राहूल भंडारी, ललित जैन आणखी एक अशा 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भंडारी आणि जैन यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण पाटील हे बिल्डरांकडून ठेकेदारी पद्धतीने काम घेत होते. मात्र आरोपींनी काम झाल्यावरही प्रवीण यांच्या कामाचे पैसे दिले नाहीत. त्यांनी कामाचे पैसे मिळावेत, यासाठी वारंवार पाठपुरावा केला. मात्र प्रवीण यांना पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे प्रवीण यांनी मंगळवारी  चिंचवड स्टेशन येथील पाटील प्लाझा येथील एका बिल्डरच्या  कार्यालयासमोर दिवसभर थांबूले.

त्यानंतरही त्यांना पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे बुधवारी सकाळी  प्रवीण यांनी विषारी औषध प्राशन केले. प्रवीण यांनी विषारी औषध प्राशन केल्याची माहिती समजताच त्यांना चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आत्महत्या करण्यापूर्वी प्रवीण यांनी चिठ्ठी लिहिली. त्यामध्ये आरोपींची नावे आहेत. त्यानुसार निगडी पोलीसांनी  गुन्हा दाखल केला आहे.

आरोपींनी संगनमत करून बांधकामाचे पैसे न देता प्रवीण पाटील यांची एक कोटी 94 लाख एक हजार 616 रुपयांची फसवणूक करत आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक महेंद्र आहेर तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *