Political News : तळेगाव, लोणावळा, आळंदी नगरपरिषद प्रशासन लागले निवडणूकीच्या कामाला; इच्छूक हौशे- गवश्यांचीही तयारी
Pckhabar- तळेगाव दाभाडे, लोणावळा आणि आळंदी नगर परिषदेचे प्रशासन सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्व तयारीच्या कामाला सोमवारपासून सुरुवात केली आहे. तर सर्वच राजकीय पक्षातील इच्छूक हौशे- गवश्यांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद, नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणूकीसाठी कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. 23 ऑगस्टपासून कामकाजाला सुरुवात करण्याचेही आदेश दिले असून त्यानुसार काल सोमवारपासून तळेगाव दाभाडे, लोणावळा आणि आळंदी या नगरपरिषदेच्या तर देहूगाव नगरपालिकेच्या निवडणूक आराखडा तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
तळेगाव दाभाडे, लोणावळा आणि आळंदी या नगरपरिषदेच्या विद्यमान सदस्यांची मुदत डिसेंबर अखेर संपणार आहे. या तिन्ही नगरपरिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. तर देहूगावात ग्रामपंचायत बरखास्त होऊन नगरपालिका अस्तित्वात आली आहे.
या तिन्ही नगरपरिषदेमध्ये गेल्या पंचवार्षिकला दोन सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक झाली होती. यावेळेला एक सदस्य पद्धतीने निवडणूक आयोगाने आराखडा तयार करण्याची सूचना केली आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या निवडणुकीत १३ प्रभागातून एकूण २६ नगरसेवक निवडून आले होते. तर नगराध्यक्षा या थेट जनतेमधून निवडून आल्या होत्या, असे एकूण नगराध्यक्षासह २७ नगरसेवक कार्यरत आहेत. तसेच 2011 च्या ची जनगणना गृहीत धरून प्रभाग रचना होणार आहे. त्यामुळे सगळीच प्रभाग रचना बदलणार असल्याने प्रभाग कशा पद्धतीने होतात, आरक्षण कसे जाहीर होईल, याकडे इच्छूकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या तिन्ही नगरपरिषदांची निवडणूक डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. निवडणुकीसाठी चारच महिने उरले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, आरपीआय, मनसे, या शिवाय स्थानिक पातळीवरील आघाड्या, समित्यांचे इच्छूक कामाला लागले आहेत. अनेक इच्छूक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली ओळख करून देत आहेत. जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.







Leave a Reply